शिवसेनेच्या शिंदे गटाचे नेते सातत्याने ठाकरे गटावर, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्यावर टीका करत आहेत. अशातच शिवसेना सोडून एकनाथ शिंदेंबरोबर गेलेल्या एका नेत्याने उद्धव ठाकरेंबाबत एक वक्तव्य केलं आहे. महाविकास आघाडीत उद्धव ठाकरेंना मिळत असलेल्या वागणुकीवर या नेत्याने खंत व्यक्त केली आहे. या नेत्याचं नाव आहे. राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई असं या नेत्याचं नाव आहे. देसाई हे साताऱ्यातील पाटण विधानसभेचे आमदार आहेत.
माध्यमांशी बातचित करताना शंभूराज देसाई म्हणाले, मे २०२२ पर्यंत आम्ही सर्वजण म्हणजेच ५६ आमादार उद्धवजींबरोबर होतो. संख्याबळ त्यांच्याबरोबर होतं. विधानसभेतल्या आमदारांची संख्या त्यांच्याबरोबर होती. संख्याबळ असल्यामुळे आमदारांचं ज्यांना महाविकास आघाडी करायची होती ते चर्चा करायला मातोश्रीवर यायचे. आता त्यांच्याकडे संख्याबळ राहिलेलं नाही. लोकशाहीत या गोष्टीला महत्त्व आहे.
देसाई म्हणाले, ज्याच्या पाठीपाागं संख्याबळ आणि रामराम घालणार लोकशाहीतली मंडळी आहे त्याची ताकद जास्त. त्यामुळे संख्याबळ घटलं, विश्वासू, जवळचे नेते, आमदार, खासदार सोडून गेले की, काय वेळ येते ती उद्धव ठाकरे यांच्यावर आली आहे. त्यामुळे मातोश्रीच्या पायऱ्या उतरून त्यांना फिरावं लागतंय.
हे ही वाचा >> महाराष्ट्रातील बियाणे उत्पादकांचे तेलंगणा, आंध्र प्रदेशात स्थलांतर; सरकारच्या उदासीनतेमुळे बियाणे बाजारास उतरती कळा
मंत्री शंभूराज देसाई म्हणाले की, “महाविकास आघाडीच्या बैठकीच्या खुर्चीत सामान्य नेत्यांसोबत उद्धव ठाकरे यांना बसावं लागतंय. महाविकास आघाडीच्या बैठकीत कॉमन कोच शेअर करावा लातोय. उद्धवजींच्या बाबतीत घडत असलेली ही गोष्ट गोष्ट खटकली.” यावर देसाई यांना सवाल करण्यात आला की, तुम्हाला हे पाहून वाईट वाटलं का? तर यावर उत्तर देताना देसाई म्हणाले, मला खटकलं. खटकलं आणि वाईट वाटलं यात फरक आहे. त्यामुळे तुम्हाला जो काही अर्थ घ्यायचा तो घ्या.