निवडणूक आयोगाने शिंदे गटाला ‘शिवसेना’ नाव आणि ‘धनुष्यबाण’ पक्षचिन्ह दिल्यानंतर उद्धव ठाकरे आक्रमक झाले आहेत. निवडणूक आयोगाचा निकाल एकांगी असून आपण तो मानायला तयार नाही, असं विधान उद्धव ठाकरे यांनी काल झालेल्या पत्रकार परिषदेत केलं होते. तसेच निवडणूक आयोग बरखास्त करा, अशी मागणीही उद्धव ठाकरे यांनी केली. दरम्यान, या मागणीबाबत शिंदे गटाचे नेते शंभूराज देसाई यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते साताऱ्यात पत्रकारांशी बोलत होते.
हेही वाचा – VIDEO : मुंबईतील संगीत कार्यक्रमादरम्यान गायक सोनू निगमला धक्काबुक्की; रुग्णालयात दाखल
काय म्हणाले शंभूराज देसाई?
“उद्धव ठाकरेंची ही मागणी हास्यास्पद आहे. घटनेने निवडणूक आयोगाची रचना केली आहे. राष्ट्रपतींच्या मान्यतेने निवडणूक आयुक्तांची नेमणूक केली जाते. घटनात्मक पदसुद्धा बरखास्त करा, असं उद्धव ठाकरे म्हणत असतील तर हे लोकशाहीसाठी घातक आहे. उद्धव ठाकरेंसारख्या अनुभवी नेत्याने अशाप्रकारे लोकशाहीला मारक असलेलं वक्तव्य करणं पूर्णपणे चुकीचं आहे. ही एकप्रकारे लोकशाहीची थट्टा केल्याचा प्रकार आहे”, अशी प्रतिक्रिया शंभूराज देसाई यांनी दिली.
उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
यावेळी बोलताना त्यांनी उद्धव ठाकरेंवर खोचक टीकाही केली. “उद्धव ठाकरे मतोश्रीवर बसून निवडणूक आयोग बरखास्त करू शकतात. त्यांनी मातोश्रीवर बसून एक आदेश काढाला तर निवडणूक आगोय बरखास्त होऊ शकतो”, असे ते म्हणाले.
हेही वाचा – निवडणूक आयोगाच्या निकालानंतर शिवसेनेची आज पहिली राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक
“लोकशाहीत जनता सुज्ञ, त्यांना… ”
दरम्यान, सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करत सुपारी घेऊन शिवसेना संपवण्याचा प्रयत्न सुरू असल्याची टीका केली होती. यावरही शंभूराज देसाई यांनी प्रतिक्रिया दिली. “काँग्रेस-राष्ट्रवादी बरोबर जाऊन उद्धव ठाकरे यांनी स्वता:च्या पायावर कुऱ्हाड मारून घेतली आहे. कोणीही कोणाला सुपाऱ्या देण्याची आवश्यकता नाही. लोकशाहीत जनता सुज्ञ आहे. योग आणि अयोग्य यातला फरक जनतेला कळतो”, असे ते म्हणाले.