राज्यात विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आहे. २० नोव्हेंबर रोजी २८८ जागांसाठी मतदान होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांच्या सभा पार पडत आहेत. या सभांमधून एकमेकांवर टीका टिप्पणी आणि आरोप प्रत्यारोपाच्या फैरीही झाडल्या जात आहेत. अशातच रविवारी उद्धव ठाकरे यांनी पाटणमधील सभेत बोलताना शंभूराज देसाई यांच्यावर सडकून टीका केली. तसेच त्यांनी मुलाच्या लग्नाचा खर्च सरकारी तिजोरीतून केला, असा आरोपही उद्धव ठाकरे यांनी केला. दरम्यान, या आरोपांना आता शंभूराज देसाई यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
काय म्हणाले शंभूराज देसाई?
शंभूराज देसाई यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेली त्यांनी उद्धव ठाकरेंच्या आरोपावर भाष्य केलं. मी सर्व चौकशीला सामोरे जायला तयार आहे. राजकीय भाषणाला येताना कुणी कुणाच्या मुलाच्या लग्नात कुठून खर्च केला, इतक्या वैयक्तिक पातळीवरून जाऊन उद्धव ठाकरे टीका करतील अशी अपेक्षा नव्हती. उद्धव ठाकरे स्वत:ला सुसंस्कृत नेते समजतात, त्यांनी अशाप्रकारची टीका करणं दुर्दैवी आहे, असं शंभूराज देसाई म्हणाले.
हेही वाचा – Patan Assembly Constituency: पाटण विधानसभेमध्ये देसाई की पाटणकर? मविआकडून उमेदवार कोण?
उद्धव ठाकरेंच्या पायाखालची वाळू सरकली
उद्धव ठाकरेंकडे आता विकासाचे मुद्दे नाही. पाटणच्या विकासासाठी त्यांच्याकडे योजना आहे का? हे न सांगता त्यांनी माझ्या मुलाचं लग्न त्यांनी काढलं. मला लुटमार मंत्री म्हणाले. याचा अर्थ त्यांच्याकडे पक्षाचं धोरण तसेच मतदारसंघाच्या विकासाचं धोरण नाही. मुळात आम्हाला जे जनतेचं समर्थन मिळते आहे, ते बघून त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळे अशाप्रकारची टीका केली जाते आहे, असेही ते म्हणाले.
हेही वाचा – चुकीच्या लोकांच्या संगतीमुळे उद्धव ठाकरे दबावाखाली, मंत्री शंभूराज देसाई यांचा टोला
उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले होते?
दरम्यान, उद्धव ठाकरेंनी रविवारी पाटणच्या सभेत बोलताना शंभूराज देसाई यांच्यावर जोरदार टीका केली होती. “पाटणमध्ये एक गद्दार आहे. तो राज्यातील मंत्री लुटमार मंत्री आहे. त्याने मंत्री असताना मुलाच्या लग्नासाठी सरकारी पैशांचा वापर कसा केला हे मला माहिती आहे. फक्त सत्ता येऊ द्या, त्यानंतर यांची सगळी प्रकरणं मार्गी लावतो”, असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. तसेच “याच गद्दाराने पाटणमध्ये उद्योग का आणले नाही? हे त्याला विचारा. या लोकांना मी सर्व दिले. तरीही यांनी मंत्रीपदाचा गैरवापर केला. गद्दारी करुन ते सुरतला गेले. तिकडून गुवाहाटीला गेले.” अशी टीकाही त्यांनी केली होती.