अलीकडील काही दिवसांपासून अजित पवार यांची मुख्यमंत्रीपदी वर्णी लागण्याची चर्चा सुरु आहे. त्यातच माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या विधानाने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. एकनाथ शिंदे अपात्र ठरतील. त्यानंतर अजित पवार मुख्यमंत्री होतील, असं वक्तव्य पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं आहे. याला शिवसेना ( शिंदे गट ) आमदार शंभुराज देसाई यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
पृथ्वीराज चव्हाण काय म्हणाले?
“महाराष्ट्रातील लोकसभेच्या जागांवरून नरेंद्र मोदी सत्तेत राहतील की नाही, हे ठरणार आहे. एकनाथ शिंदे ठाण्याच्या बाहेर प्रभाव पाडू शकले नाहीत. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भाजपाला लोकसभा निवडणुकीसाठी सामोरे जाता येणार नाही. अजित पवार यांना सामावून घेतलं आहेच, तर त्यांना जबाबदारी देण्यात यावी, असा निर्णय झाला आहे,” असं आकलन पृथ्वीराज चव्हाण यांनी वर्तवलं.
“विधानसभा अध्यक्ष एकनाथ शिंदे यांच्या अपात्रतेच्या निर्णयाचा निकाल देतील. तो १० ऑगस्टपर्यंत येण्याची शक्यता आहे. तेव्हा एकनाथ शिंदे यांचं निलंबन होईल. त्यानंतर पद रिक्त झाल्यानंतर अजित पवार यांना मुख्यमंत्री केलं जाईल. कारण, लोकसभा निवडणुकीसाठी अजित पवार यांची गरज आहे,” असं पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलं.
हेही वाचा : “मणिपूर प्रकरणात अण्णा जागे आहेत हे दिसले, म्हणून…”, ठाकरे गटाने केली मागणी
पृथ्वीराज चव्हाण यांच्या वक्तव्यावर शंभुराज देसाई यांनी टीका केली आहे. “अलीकडे पृथ्वीराज चव्हाण संजय राऊत यांना भेटलेले दिसत आहेत. त्यामुळे संजय राऊत यांचा वाण नाहीतर गुण पृथ्वीराज चव्हाण यांना लागला आहे. संजय राऊत सकाळ, दुपार, संध्याकाळी सरकार जाणार असे बोलतात. तसे पृथ्वीराज चव्हाण बोलले आहेत. काँग्रेसच्या काही आमदारांना निधी मिळाल्यानंतर ते एकमेकांकडे संशयाने पाहात आहेत. त्यामुळे आमच्या घरात वाकुन पाहण्याची गरज नाही,” अशा शब्दांत शंभुराज देसाई यांनी पृथ्वीराज चव्हाण यांना खडेबोल सुनावले आहेत.
हेही वाचा : “माझ्या मतदारसंघात १०० कोटींचा निधी, पण कुणाला दिला माहीत नाही”, निधी वाटपावरून आव्हाडांचं टीकास्र!
“विधानसभा अध्यक्ष सर्व गोष्टी तपासून अपात्रतेचा निर्णय घेतील. तो निर्णय आम्हाला मान्य असेल. त्यामुळे संजय राऊत यांच्या संगतीत राहून पृथ्वीराज चव्हाण यांनी भविष्य वर्तवण्याचं काम करु नये,” असा सल्लाही शंभुराज देसाई यांनी दिला आहे.