Shambhuraj Desai Sanjay Shirsat on Suresh Dhas : देवेंद्र फडणवीसांच्या चेहऱ्याकडे पाहून मतदारांनी एकनाथ शिंदे यांचा बाण (धनुष्यबाण हे शिवसेनेचं निवडणूक चिन्ह) आणि अजित पवारांचं घड्याळ (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं निवडणूक चिन्ह) निवडून दिल्याचं वक्तव्य भाजपा आमदार सुरेश धस यांनी केलं आहे. यावर आता शिवसेनेच्या शिंदे गटाने आक्षेप घेतला आहे. पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी म्हटलं आहे की “चेहरा फडणवीसांचा असला तरी नेतृत्व हे एकनाथ शिंदे यांचंच होतं”. तर, सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट म्हणाले, “आम्ही ही निवडणूक एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढवली, त्यामुळे आजवर कुठल्याही पक्षाला किंवा आघाडीला मिळालं नव्हतं असं यश महायुतीला मिळालं”.
सुरेश धस म्हणाले होते की “विधानसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांचा चेहरा पाहून लोकांनी महायुतीला मतं दिली. ‘हा इमानदार चेहरा आहे, यांच्या हाती महाराष्ट्र दिला पाहिजे’, या प्रमुख भावनेतून लोकांनी आम्हाला निवडून दिलं. आमच्याबरोबर घड्याळ व धनुष्यबाणाला देखील निवडून दिलं. धसं यांच्या या वक्तव्यावर संजय शिरसाट यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
सुरेश धसांच्या वक्तव्यावर संजय शिरसाटांचा आक्षेप
संजय शिरसाट म्हणाले, “सुरेश धस यांनी त्यांच्या पक्षाबद्दल चांगलं बोलावं यात काही गैर नाही. परंतु, संपूर्ण महाराष्ट्र जाणतो की विधानसभा निवडणूक एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना महायुतीने त्यांच्या नेतृत्वाखाली लढवली होती. ही गोष्ट देवेंद्र फडणवीस व अजित पवार देखील मान्य करतील. यापूर्वी आमचं सरकार (एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील महायुतीचं सरकार) असताना एकनाथ शिंदे यांनी दिवसाचे २४ तास, आठवड्याचे सातही दिवस काम केलं. त्याला जनतेकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला. त्यामुळे यापूर्वी कधीही न घडलेलं या निवडणुकीत घडलं. प्रचंड बहुमताने महायुतीचं सरकार आलं आणि त्याचं श्रेय एकनाथ शिंदे यांना जातं.
“चेहरा फडणवीसांचा, पण नेतृत्व एकनाथ शिंदेंचं”
संजय शिरसाट यांच्यापाठोपाठ मंत्री शंभूराज देसाई यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. देसाई म्हणाले, “नक्कीच निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांचा चेहरा होता. परंतु, ज्यांच्या नेतृत्वाखाली महायुतीने ही निवडणूक लढवली तो चेहरा म्हणजे एकनाथ शिंदे. तसेच एकनाथ शिंदे सातत्याने जनतेला सांगत आले की मी देवेंद्र फडणवीस व अजित पवार या दोघांना बरोबर घेऊनच काम करत आहे. ते नेहमी म्हणायचे की मी व माझे दोन्ही उपमुख्यमंत्री आम्ही तिघे मिळून सरकार चालवत आहोत. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनीच महायुतीचं नेतृत्व केलं आहे.