कराड : खासदार संजय राऊतांच्या बोलण्याकडे आम्ही गांभीर्याने पहात नसून दुर्लक्षच करतो, गुन्हेगारी जगताशी (अंडरवर्ल्ड) कोणाचे संबंध आहेत आणि शंभर दिवस ते कोणत्या पुण्यकर्मासाठी कारागृहात जाऊन आले. याचा खुलासा त्यांनी आधी करावा. तसेच जामिनावर बाहेर असल्याचे त्यांनी लक्षात ठेवावे, असा सूचक इशारा राज्याचे उत्पादन शुल्कमंत्री शंभूराज देसाई यांनी कराडमध्ये माध्यमांशी बोलताना दिला.

हेही वाचा >>> ‘योगी आदित्यनाथ यांचा अभ्यास कमी’, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विधानावरून अजित पवार गटाची टीका

राज्यातील कायदा-व्यवस्था राखण्यात गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अपयशी ठरल्याने त्यांनी तत्काळ राजीनामा द्यावा, महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी या मागणीसाठी विरोधक आक्रमक आहेत. अशावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे गुन्हेगारांसोबत असलेले छायाचित्रे समाजमाध्यमांवर प्रदर्शित करून मुख्यमंत्र्यांचे मंत्रिमंडळच गुन्हेगारी जगतातील (अंडरवर्ल्ड) टोळी चालवत असल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला असल्याबाबत पत्रकारांनी विचारले. यावर मंत्री शंभूराज बोलत होते. ते पुढे म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही राज्यात २४ बाय ७ कार्यरत आहोत. त्यामुळे नाहक, बिनबुडाचे आरोप करणाऱ्यांकडे आम्ही लक्ष देत नाही. संजय राऊतांची अजून निर्दोष मुक्तता झालेली नाही. त्यांचे कोणाशी संबंध आहेत. कोणत्या पुण्यकर्मासाठी ते आत जाऊन आले, याचे उत्तर त्यांनी आधी द्या, नंतरच मुख्यमंत्र्यांवर बोला, असे शंभूराजेंनी खासदार राऊतांना सुनावले. लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने महायुतीच्या  साताऱ्यातील उमेदवारीबाबत छेडले असता महायुतीतील एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे तीन नेते एकत्र बसून राज्यातील उमेदवारीचा निर्णय घेतील. शिवसेनेच्या जागा वाटपाचे निर्णय एकनाथ शिंदेच  घेणार असून, ते सांगतील, त्याप्रमाणेच आम्ही सर्वजण त्याची काटेकोर अंमलबजावणी करू, असा ठाम विश्वास मंत्री शंभूराजेंनी दिला.

Story img Loader