शिवसेनेच्या शिंदे गटाचे नेते आणि राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली आहे. देसाई म्हणाले की, “यापूर्वी कधी उद्धव ठाकरे असे टक्के-टोमणे किंवा घालून पाडून बोलत नव्हते. परंतु संजय राऊतांची संगत वाढल्यापासून ते असं बोलायला लागले आहेत.”
देसाई म्हणाले की, “उद्धव ठाकरे यांची संजय राऊतांसोबतची संगत वाढली तेव्हापासून उद्धव ठाकरे असं बोलायला लागले आहेत. मी त्यांना म्हटलं, तुम्ही हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे वारसदार आहात, त्यांचा ज्वलंत हिंदुत्वाचा वारसा तुमच्याजवळ आहे. त्यासाठी आम्ही सर्वजण तुमच्यासोबत आहोत. पण त्यांनी ऐकलं नाही. संजय राऊत नेमकं काय करत आहेत ते कोणासाठी काम करत आहेत हा संशोधनाचा विषय आहे.”
हे ही वाचा >> “पवारांची चावी कुठेही चालते”; गुलाबराव पाटलांचा टोला, म्हणाले, “त्यांनी उठोबा-बठोबा..
विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या १७ व्या दिवशी उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस विधीमंडळाबाहेर एकत्र दिसले. सत्तापालट झाल्यानंतर ठाकरे-फडणवीस एकमेकांना पहिल्यांदाच भेटले, त्यांनी गप्पादेखील मारल्या. यावर वेगवेगळ्या राजकीय चर्चांना उधाण आलं यावर. शंभूराज देसाई म्हणाले की, “देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्याचं पाहून बरं वाटल. यावेळी फडणवीसांनी त्यांना सांगितलं असेल, शिवसेना आता एकनाथ शिंदेंची आहे. निवडणूक आयोगाने त्यावर शिक्कामोर्तब केलं. त्यामुळे तुम्ही आता एकनाथ शिंदे यांच्यासोबत एकत्र काम करा.”