मंगळवारी (१३ जून) राज्यातील प्रमुख वृत्तपत्रात एक जाहिरात देण्यात आली आहे. ‘देशात मोदी अन् राज्यात शिंदे’ असा संदेश या जाहिरातीतून दिला आहे. यापूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात ‘देशात नरेंद्र अन् महाराष्ट्रात देवेंद्र’ अशी घोषणा दिली होती. पण आज प्रमुख वृत्तपत्रांच्या पहिल्या पानावर देण्यात आलेल्या जाहिरातीवर ‘राष्ट्रामध्ये मोदी, महाराष्ट्रात शिंदे’ असा मजकूर छापण्यात आला आहे. या जाहिरातीवरून महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या जाहिरात प्रकरणावरून दिवसभर अनेक राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिंदे गटाच्या नेत्यांनी जाहिरातीमधील दाव्याचं समर्थन केलं. या घडामोडींनंतर शिंदे गटाचे नेते शंभूराज देसाई यांनी घुमजाव घेतला आहे. आजच्या वर्तमानपत्रात छापून आलेल्या जाहिरातीचा शिवसेनेशी (शिंदे गट) काहीही संबंध नाही. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांच्या हितचिंतकांनी ही जाहिरात दिली असावी, असं स्पष्टीकरण देसाई यांनी दिलं. ते प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.

हेही वाचा- “इतके लोकप्रिय आहात तर मग…”, अजित पवारांची एकनाथ शिंदेंवर तुफान टोलेबाजी!

संबंधित जाहिरातीवर स्पष्टीकरण देताना शंभूराज देसाई म्हणाले, “आज वर्तमानपत्रात जी जाहिरात छापून आली आहे, त्या जाहिरातीचा शिवसेना पक्षाशी (शिंदे गट) कसलाही संबंध नाही. एकनाथ शिंदे किंवा देवेंद्र फडणवीस या दोन्ही नेत्यांच्या हितचिंतकांनी कदाचित ही जाहिरात दिली असेल. पण एक गोष्ट समाधानकारक आहे की, पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर शिवसेना-भाजपाचेच नेते आहेत. शिवसेना-भाजपा युती आणि आमचे मित्रपक्ष ५० टक्क्यांच्या पुढे आहेत, हे सर्व्हेवरून दिसलं आहे.”

हेही वाचा- ‘राष्ट्रामध्ये मोदी, महाराष्ट्रात शिंदे’, जाहिरातीवर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

“आमच्यात पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकासाठी रस्सीखेच नाही. आमची संयुक्त जबाबदारी आहे. बाळासाहेब ठाकरे आणि अटलबिहारी वाजपेयी यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर ३० वर्षांपूर्वी जी युती केली होती, ती युती पुढे घेऊन जाण्याचं काम आम्ही करत आहोत. याला लोकांनी पसंती दिली, यातच आम्ही समाधानी आहोत. जाहिरात देणारे हितचिंतक अज्ञात आहेत” असंही शंभूराज देसाई म्हणाले.

आधी जाहिरातीचं समर्थन आता यू-टर्न?

विशेष म्हणजे शिंदे गटातील विविध नेत्यांकडून संबंधित जाहिरातीतील दाव्याचं समर्थन करण्यात आलं आहे. शंभूराज देसाई यांनीही आज सकाळी ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलताना जाहिरातीतील मजकूराचं समर्थन केलं होतं. एकनाथ शिंदेंकडून वर्तमानपत्रात दिलेल्या जाहिरातीत बाळासाहेब ठाकरेंचा फोटो नाही, या राऊतांच्या टीकेला उत्तर देताना शंभूराज देसाई म्हणाले होते, “बाळासाहेब ठाकरे हे आमच्या हृदयात आहेत. आम्ही आज जे काही आहोत, ते बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळेच आहोत.त्यामुळे काहीतरी वक्तव्य करून राऊत वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करतायत. हा एक सर्व्हे आला आहे. यामध्ये लोकांची मतं जाणून घेतली जातात. महाराष्ट्रात आमची युती आहे. सर्वसामान्य लोकांनी दिलेला हा कल आहे. जनमताचा आपण आदर केला पाहिजे.”

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shambhuraj desai u turn on advertisement in newspaper about eknath shinde 1st choice as cm rmm
Show comments