Shambhuraj Desai on Eknath Shinde as Maharashtra Chief Minister : विधानसभा निवडणुकीत महायुतीला निर्विवाद यश मिळाल्यानंतर गेल्या दोन दिवसांपासून मुख्यमंत्रीपदावरून एकनाथ शिंदे आणि शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली होती. मात्र सोमवारी मध्यरात्रीपासून त्यांचा व पक्षातील अनेक प्रमुख नेत्यांचा सूर बदल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. भाजपाने स्पष्ट संदेश दिल्याने शिंदे यांच्या भूमिकेत बदल झाल्याचं बोललं जात आहे. मंगळवारी शिवसेनेच्या अनेक नेत्यांनी मवाळ भूमिका घेतली. तसेच दीपक केसरकरांनी तर स्पष्ट सांगितलं की दिल्लीतले पक्षश्रेष्ठी घेतील तो निर्णय आम्हाला मान्य असेल. मात्र, महायुतीने व शिवसेनेने सर्व निर्णय दिल्लीतल्या भाजपा पक्षश्रेष्ठींकडे (पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह) यांच्यावर सोपवल्याचं केसरकरांच्या वक्तव्यावरून स्पष्ट झालं आहे. मात्र, गृहराज्यमंत्री व शिवसेनेतील वरिष्ठ नेते शंभूराज देसाई म्हणाले, “एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री व्हावेत, अशी आमची सर्वांची इच्छा आहे”.
शंभूराज देसाई म्हणाले, “आमच्या तिन्ही पक्षांचे प्रमुख नेते (एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस व अजित पवार) तसेच इतर घटक पक्षांचे नेते एकत्र बसून चर्चा करतील आणि मुख्यमंत्रिपदावर तोडगा काढतील. ही निवडणूक आम्ही महायुती म्हणून लढलो होतो. या निवडणुकीत आम्हाला देदीप्यमान असं यश मिळालं आहे. ज्यांच्या नेतृत्वाखाली आम्हाला हे यश मिळालं, ज्यांच्या नेतृत्वाखाली महायुतीने निवडणूक लढवली, त्यांच्याच नेतृत्वाखालचं सरकार यावं अशी आम्हा सर्व शिवसैनिकांची आणि मतदारांची इच्छा आहे. तशीच भावना आमच्या सर्व आमदारांच्या मनात आहे. शिवसेनेच्या बैठकीत यावर आम्ही चर्चा केली. त्यानंतर आमच्या पक्षाच्या वतीने आम्ही काही प्रमुख मंडळींनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. आमच्या बैठकीत झालेली चर्चा आणि शिवसेनेची भूमिका फडणवीसांना सांगितली आहे”.
हे ही वाचा >> आज-उद्या शपथविधी होणार नाही! राष्ट्रवादीने सांगितल्या पडद्यामागच्या घडामोडी; मुख्यमंत्रिपदाबाबत म्हणाले..
शंभूराज देसाई काय म्हणाले?
शंभूराज देसाई म्हणाले, “मला इथं नमूद करायचं आहे की आमच्यात, महायुतीमध्ये मुख्यमंत्रिपदावरून कोणत्याही प्रकारची चढाओढ नाही, कुठलीही रस्सीखेच नाही. आम्ही चर्चेतून खेळीमेळीच्या वातावरणात मुख्यमंत्रिपदाबाबतचा निर्णय घेऊ. तसेच, शिवसेनेबाबतचे सर्व निर्णय घेण्याचे अधिकार आम्ही पहिल्याच दिवशी एकनाथ शिंदे यांच्याकडे दिले आहेत. आम्ही ठराव करून एकनाथ शिंदेंकडे सर्व अधिकार सोपवले आहेत. त्यामुळे शिवसेनेबाबत कुठल्याही प्रकारचा निर्णय घ्यायचा असेल तर तो केवळ एकनाथ शिंदे घेतील आणि आम्हा सर्व नेत्यांना, आमदारांना, कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना तो मान्य असेल”.
हे ही वाचा >> भाजपासमोर शिंदेंची माघार? मुख्यमंत्रिपदाबाबत केसरकरांनी मांडली शिवसेनेची भूमिका; म्हणाले, “शिंदेंनी राजीनामा देणं म्हणजे…”
दीपक केसरकर काय म्हणाले होते?
केसरकर काही वेळापूर्वी म्हणाले होते, “भाजपा पक्षाश्रेष्ठींच्या सूचनेनुसार सरकार स्थापन होईल. आपला नेता मुख्यमंत्री व्हावा अशी भावना प्रत्येक कार्यकर्त्याची असते. मात्र तिन्ही पक्षांनी सांगितलं आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह जो निर्णय घेतील तो सर्वांना मान्य असेल. वरिष्ठ नेते घेतील तो निर्णय आम्हाला मान्य असेल असं एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं आहे. मुख्यमंत्रिपदाबाबत मोदी व शाह घेतील तो निर्णय सर्वांनाच मान्य असेल”.
© IE Online Media Services (P) Ltd