राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर सडकून टीका केली. “शरद पवारांना आजकाल उद्धव ठाकरेंची फारच चिंता लागली आहे, असं आम्हाला वाटतं,” असं म्हणत शंभुराजेंनी टोला लगावला. तसेच पवारांचं ऐकल्यामुळेच शिवसेनेची, विशेषतः उद्धव ठाकरे गटाची आज ही अवस्था झाली आहे, अशी टीका केली. देसाई आज (२१ सप्टेंबर) पंढरपूर येथे शिवसेनेतील शिंदे गटाच्या हिंदू गर्व गर्जना मेळाव्यास आले होते. त्यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते.
शंभूराज देसाई म्हणाले, “शरद पवारांना आजकाल उद्धव ठाकरे यांची फारच चिंता लागली आहे, असं आम्हाला वाटतं. आमचं सर्वांचं म्हणणं आहे की, पवारांचं जास्त ऐकल्यामुळेच शिवसेनेची, विशेषतः उद्धव ठाकरे गटाची ही अवस्था झाली आहे.”
“ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल पाहिले, तर शिवसेना उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात चौथ्या पाचव्या क्रमांकावर फेकली गेली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी याचा विचार करायला हवा. शरद पवार असं का बोलत आहेत? असं बोलण्यामागे त्यांचा उद्देश काय आहे?” असा सवाल शंभुराजेंनी विचारला.
“बाळासाहेबांच्या विचाराचं सोनं लुटण्याचा अधिकार फक्त आम्हालाच, कारण…”
शंभुराजे देसाई पुढे म्हणाले, “वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या विचारांचं सोनं लुटण्याचा अधिकार आम्हालाच आहे. कारण केवळ राज्यातील सत्तेसाठी, मुख्यमंत्रिपदासाठी उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या विचारांवरील नैसर्गिक सेना भाजपाची युती सोडली आणि काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत अनैसर्गिक युती केली होती. ते महाराष्ट्रातील जनतेलाही मान्य नव्हतं.”
हेही वाचा : “…तर आम्हीपण तुमच्या गटात येतो” ठाकरे गटातील आमदारांच्या रात्रीच्या फोनबाबत शहाजीबापू पाटलांचा गौप्यस्फोट
“कालच्या ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपा आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना पहिल्या क्रमांकावर आहे,” असंही शंभुराजे देसाईंनी नमूद केलं.