अर्थ खात्याची सूत्रे हाती येताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या बंडखोर आमदारांवर निधीवर्षांव केला आहे. त्यांनी या आमदारांच्या मतदारसंघातील विकासकामांसाठी २५ कोटी किंवा त्याहून अधिक निधी मंजूर केला असून, त्यासाठी पुरवणी मागण्यांमध्ये तरतूद करण्यात आली आहे. यावरून विरोधकांकडून टीका करण्यात येत आहे. आता यावर शिवसेना ( शिंदे गट ) आमदार शंभूराज देसाई यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
शंभुराज देसाई म्हणाले, “अर्थसंकल्पानंतर दोन वेळा पुरवणी मागण्या मांडण्यात येतात. ज्या कामांना निधीची गरज आहे, ती पुरवणी मागण्यांमध्ये समाविष्ट केली जातात. पुरवणी मागणीत जयंत पाटील यांच्या मतदारसंघालाही निधी देण्यात आला आहे. निधीसाठी आमदार संबंधित विभाग, मुख्यमंत्री, अर्थमंत्री यांच्याकडे पाठपुरावा करतात. त्या आमदारांच्या कामांची गरज पाहून निधी दिला जातो. शिंदे-फडणवीस सरकारमध्ये निधीवाटपात कोणताही दुजाभाव केला जात नाही.”
हेही वाचा : कष्टाळू अन् गतिशील मुख्यमंत्री; मोदींकडून शिंदे यांचे कौतुक; भेट हा निरोप समारंभ-ठाकरे गटाचा टोला
शंभुराज देसाई यांनी पुढं म्हटलं की, “अजित पवार अर्थमंत्री असताना आम्हाला कमी तर काही आमदारांना जास्त निधी मिळायचा, हे आम्ही उद्धव ठाकरे यांना सांगायचो. पण, उद्धव ठाकरे यांनी ऐकून घेत मार्ग काढण्याची गरज होती. आता अजित पवार यांची भूमिका बदलली आहे. तेव्हा अजित पवार मोदी आणि भाजपा सरकारच्या विरोधातील भूमिका घेत होते. आता मोदी यांच्याशिवाय देशाला दुसरं नेतृत्व नाही, असं अजित पवार यांनी सांगितलं.”
हेही वाचा : “…हा ठाकरे गटावर अन्याय आहे”, निधी वाटपावरून अंबादास दानवेंचं सरकारवर टीकास्र!
“आपल्याबरोबर असलेल्या आमदार, खासदारांना न्याय मिळाला पाहिजे. योग्य निधी मिळाला पाहिजे, ही भूमिका एकनाथ शिंदे यांची असती. हीच भूमिका उद्धव ठाकरे यांनी घेत समान निधी दिला असता, तर ही वेळ आली नसती,” असा टोलाही शंभूराज देसाई यांनी लगावला आहे.