सोलापूर : अकलूज येथील शंकरराव मोहिते-पाटील सहकारी बँकेचा परवाना भारतीय रिझर्व बँकेने अखेर रद्द केला आहे. यापूर्वी या बँकेवर निर्बंध लादूनही त्यात अपेक्षित सुधारणा झाली नाही. त्यामुळे या बँकेचा परवाना रद्द करण्याची कारवाई करावी लागली. मोहिते पाटील घराण्याशी संबंधीत संस्थेवरील या कारवाईमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

या कारवाईनुसार बँकेतील सर्व व्यवहार थांबविण्यात आले आहेत. थोड्याच दिवसांत ही बँक अवसायनात काढण्याच्या दृष्टीने अवसायक नेमण्यात यावा, अशा सूचनाही रिझर्व बँकेने दिल्या आहेत. याबाबतचा आदेश रिझर्व बँकेचे मुख्य महाव्यवस्थापक पुनीत पांचोली यांच्या स्वाक्षरीने जारी करण्यात आला आहे.

१९८३ साली स्थापन झालेल्या शंकरराव मोहिते पाटील सहकारी बँकेच्या अकलूज येथील मुख्य कार्यालयासह सोलापूर, टेंभुर्णी, इंदापूर, करमाळा, पुण्यातील कोथरूड आदी नऊ शाखा होत्या. राज्यातील तालेवार घराण्यांपैकी ओळखल्या जाणाऱ्या अकलूजच्या मोहिते-पाटील घराण्यातील दिवंगत माजी मंत्री प्रतापसिंह मोहिते-पाटील व त्यांच्या पश्चात त्यांचे पुत्र धवलसिंह मोहिते-पाटील यांच्या वर्चस्वाखाली शंकरराव मोहिते-पाटील सहकारी बँकेचा एकहाती कारभार चालत होता. प्रतापसिंह मोहिते-पाटील हे ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते-पाटील यांचे बंधू होत. परंतु त्यांच्यात दुरावा निर्माण होऊन त्यांची राजकीय वाटचाल एकमेकांच्या विरुद्ध दिशेने होत आली आहे.

शंकरराव मोहिते-पाटील सहकारी बँकेचा कारभार यापूर्वीच रसातळाला गेला होता. २०२३ साली हस्तक्षेप करून या बँकेच्या कारभारावर रिझर्व बँकेकडून निर्बंध लादण्यात आले होते. गेल्या वर्षीही दिलासा मिळाला नव्हता. दरम्यान, अशा प्रतिकूल काळातही या बँकेत २७ कोटींचा घोटाळा उघडकीस आला होता.

या बँकेत सध्या पुरेसे भांडवल नाही. शिवाय, नजीकच्या काळात उत्पन्नाची शक्यताही नाही. त्यामुळे बँकिंग नियमन कायद्यातील तरतुदींचे पालन होत नाही. त्यामुळे बँकेचा कारभार चालू राहणे हे ठेवीदारांच्या हिताला बाधा निर्माण करणारे असल्यामुळे बँकेचा परवाना रद्द करण्याचा निर्णय रिझर्व्ह बँकेने घेतला आहे.

या बँकेच्या ठेवीदारांच्या ठेवींवरील संरक्षण योजनेमुळे ठेवीदार पाच लाख रुपयांपर्यंत ठेव रकमेवर विम्याचा दावा करू शकतो. बँकेकडे विमा संरक्षण योजनेशी निगडित ९२.७२ टक्के ठेवीदार आहेत. ४७ कोटी ८९ लाख रुपये एवढी रक्कम परत केली आहे.

जिल्ह्यातील दहावी बुडित बँक

यापूर्वी सोलापूर जिल्हा महिला सहकारी बँक, सोलापूर जिल्हा उद्योग सहकारी बँक, सोलापूर जिल्हा नागरी सहकारी औद्योगिक बँक, मर्चंट्स सहकारी बँक, अर्जुन सहकारी बँक, भारत सहकारी बँक, इंदिरा महिला श्रमिक सहकारी बँक, स्वामी समर्थ सहकारी बँक, लक्ष्मी सहकारी बँक आदी बँका बुडाल्या आहेत. त्यात आता शंकरराव मोहिते पाटील सहकारी बँकेची भर पडली आहे.