महाराष्ट्रात सध्या महापुरुषांवरील वादग्रस्त वक्तव्यावरून राजकीय पारा चढला आहे. या पार्श्वभूमीवर दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (JNU) फ्रेंच साहित्याचे आणि तत्त्वज्ञानाचे अभ्यासक प्राध्यापक डॉ. शरद बाविस्कर यांनी यावर प्रतिक्रिया दिली. “रोजगार, महागाई, आरोग्य, शिक्षण या मुलभूत प्रश्नांवर रोज चर्चा व्हायला लागली, तर अवघड जाईल. म्हणून रोज काहीतरी गोंधळ तयार करून तणाव निर्माण केला जात आहे,” असा आरोप शरद बाविस्कर यांनी केला. ते शुक्रवारी (२३ डिसेंबर) धुळ्यात आयोजित एका कार्यक्रमात बोलत होते.
डॉ.शरद बाविस्कर (प्राध्यापक, JNU) म्हणाले, “महापुरुषांचे विचार आणि त्यांच्याविषयी भावनिक होणं या दोन गोष्टी आहेत. भावनिक होणं स्वाभाविक आहे. मात्र, भावनांचा दुरुपयोग करून विचार न वाचता त्यांच्याविषयी बेताल वक्तव्य करणं सुरू आहे. सध्या जी लोकं वक्तव्य करत आहेत त्यांनी महापुरुषांचे कोणतेही विचार वाचलेले नाहीत.”
“वादग्रस्त वक्तव्ये करणारे विचारांची चर्चा करत नाहीत”
“वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्यांना माहिती आहे की, लोकांना मूळ मुद्द्यापासून वेगळ्या दिशेला फरफटत न्यायचे असेल, तर वादग्रस्त वक्तव्य करा. ही त्यांची रणनीती आहे. त्यांना माहिती आहे की, हा अस्मितेचा विषय आहे. ते विचारांची चर्चा करत नाहीत.
व्हिडीओ पाहा :
“…म्हणून रोज गोंधळ तयार करून तणाव निर्माण केला जातोय”
शरद बाविस्कर पुढे म्हणाले, “ते काहीतरी निराधार वक्तव्य करून लोकांची दिशा कशी बदलत आहेत. कारण रोजगार, महागाई, आरोग्य, शिक्षण या मुलभूत प्रश्नांवर रोज चर्चा व्हायला लागली तर त्यांना अवघड जाणार आहे. त्याचमुळे रोज काहीतरी गोंधळ तयार करून तणाव निर्माण करत आहेत.”
हेही वाचा : “ब्राह्मणांनो परिसर सोडा आणि शाखेत…”, ‘जेएनयू’मध्ये ब्राह्मणविरोधी घोषणांनी भिंती रंगल्या, चौकशी सुरू
“आयटी सेल सोशल मीडियावरही अनेक गोष्टी मॅनेज करते”
“माध्यमांबद्दल आदर राखून सांगतो की, वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्यांना माहिती आहे की, संपूर्ण माध्यमं त्यांच्या हातात आहेत. त्यांची आयटी सेल इतकी मोठी आहे की सोशल मीडियावरही ते अनेक गोष्टी मॅनेज करतात. बेताल वक्तव्ये जाणीवपूर्वक केली जात आहेत आणि त्यामागे एक रणनीती आहे,” असा आरोप बाविस्कर यांनी केला.