शेतकरी संघटनेचे प्रणेते शरद जोशी यांचे एकेकाळी सहकारी राहिलेल्या व आता राजकीयदृष्टय़ा स्वतंत्र अस्तित्व राखणाऱ्या नेत्यांनी इतर पक्षांशी मैत्री करीत एक पाऊल पुढे टाकल्याने मातृपक्ष शेतकरी संघटनेची पंचाईत झाल्याचे चित्र पुढे आले आहे.
युतीसोबत खासदार राजू शेट्टी यांनी मैत्री करीत आगामी निवडणुकांसाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे, तर दुसरे एक नेते रघुनाथदादा पाटील यांनी ‘आप’मध्ये प्रवेश करीत शेट्टीविरुद्ध राजकीय भूमिका घेतली आहे. हे दोन्ही नेते एकेकाळचे शरद जोशी यांचे सहकारी होते. दोघेही शेतकरी संघटनेपासून दूर झाले.
मात्र, शेतकरी संघटनेचे बिरूद त्यांनी सोडले नाही. तिसरे एक ज्येष्ठ नेते विजय जावंधिया यांचाही ‘आप’सोबत संवाद सुरू आहे.
या पाश्र्वभूमीवर शेतकरी संघटनेने काँग्रेस आघाडी किंवा महायुतीशी मैत्री करणार नसल्याचे पूर्वीच स्पष्ट केले. ज्येष्ठ नेते वामनराव चटप यांनी ‘आप’सोबत काही मुद्यांवर मतभेद असले तरी भ्रष्टाचार, महागाई, महिलांची सुरक्षितता या मुद्दय़ांवर मैत्री होऊ शकत असल्याचे संकेत दिले होते.
मात्र, शेतकरी संघटना आता एकाकी पडल्याचे चित्र यातून उभे झाले आहे. या संदर्भात बोलताना शेतकरी संघटनेच्या ज्येष्ठ नेत्या सरोज काशीकर म्हणाल्या, ह्लकुणी कुणाची मैत्री केली त्याचा आमच्यावर काही फ रक पडणार नाही. ‘आप’सोबत वरिष्ठ पातळीवर संवाद सुरू आहे. ‘आप’च्या नेत्यांचा आग्रह त्यांच्या चिन्हावर संघटना उमेदवारांनी निवडणूक लढवावी, असा आहे. मात्र तो आम्हाला मान्य नाही. चंद्रपूर व नांदेड या दोन लोकसभा मतदारसंघात संघटना उमेदवार उभे करणार आहे.ह्व शरद जोशी, वामनराव चटप व त्या स्वत: मिळून याबाबत लवकरच निर्णय करणार असल्याचे काशीकर यांनी स्पष्ट केले.
कधीकाळी बारा आमदार व शरद जोशींच्या स्वरूपात राज्यसभेचा खासदार अशी ताकद असणाऱ्या संघटनेकडे आता काहीच नसल्याने त्यांच्यासाठी आगामी निवडणूक अस्तित्वाची लढाई ठरली आहे. वेगळ्या विदर्भाच्या  प्रश्नांवर आग्रही असणाऱ्या संघटनेने काही विदर्भवादी पक्षांना सोबत घेऊन पुढे कूच करण्याचे तूर्तास ठरविले आहे.

Story img Loader