Sharad Kelkar Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapsed : बडनेराचे आमदार रवी राणा व त्यांच्या पत्नी तथा अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा यांनी अमरावती येथे दहीहंडी उत्सवाचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमासाठी बॉलिवूड अभिनेता शरद केळकर याला निमंत्रित करण्यात आलं होतं. या कार्यक्रमानिमित्त अमरावतीत आलेल्या शरद केळकर याने सर्वांना दहीहंडीच्या शुभेच्छा दिल्या. तसेच शरद केळकर याने कार्यक्रमस्थळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीवर दुग्धाभिषेक करून शिवरायांच्या नावाचा जयघोष केला. दरम्यान यावेळी शरद केळकर याने सिंधुदुर्गमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्याच्या घटनेवर प्रतिक्रिया दिली.
अमरावतीत आलेल्या शरद केळकर याने टीव्ही ९ मराठीशी बातचीत केली. यावेळी शरद केळकर म्हणाला, “छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल सर्व महाराष्ट्रीय व भारतीयांच्या मनात जी भावना आहे तीच भावना माझ्याही मनात आहे. शिवराय हे आमचं दैवत आहेत, आम्ही त्यांच्यावर खूप प्रेम करतो, त्यांचा खूप आदर करतो. माझा सौभाग्य आहे की आज मला त्यांच्या मूर्तीवर अभिषेक करण्याची संधी मिळाली. यासाठी मी अमरावती येथे या दहीहंडी कार्यक्रमाचं आयोजन करणाऱ्या आयोजकांचे आभार मानतो”.
हे ही वाचा >> Chandrakant Khaire : “महाराष्ट्रात दंगली का होत नाहीत? झाल्या पाहिजेत”, चंद्रकांत खैरेंचं वादग्रस्त वक्तव्य
यावेळी शरदला छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्याच्या घटनेवर प्रतिक्रिया विचारली असता तो म्हणाला, “ही खूप वेदनादायी घटना आहे. ही घटना पाहून मला खूप दुःख झालं. मला या घटनेवर कोणत्याही प्रकारची राजकीय प्रतिक्रिया द्यायची नाही. कारण मी राजकारणात नाही”. दरम्यान, पुतळ्यावरून महाविकास आघाडी व महायुतीमध्ये चालू असलेल्या संघर्षाबाबत शरदला त्याची प्रतिक्रिया विचारली असता त्याने यावर भाष्य करण्यास नकार दिला. तो म्हणाला, “मी या राजकीय घडामोडींवर कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया देणार नाही”.
हे ही वाचा >> Devendra Fadnavis : “…उद्धव ठाकरे, शरद पवार काँग्रेसला माफी मागायला लावणार का?” फडणवीसांनी सांगितल्या ७० वर्षांतील तीन घटना
शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट
आठ महिन्यांपूर्वी नौदल दिनाचं (४ डिसेंब २०२३) औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत मालवण येथील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं लोकार्पण करण्यात आलं होतं. मात्र गेल्या आठवड्यात २६ ऑगस्ट रोजी हा पुतळा कोसळला. अवघ्या आठ महिन्यांतच हा पुतळा कोसळल्यामुळे राज्य सरकारच्या कारभारावर जोरदार टीका होत आहे. तसेच शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे.