कॉम्रेड शरद पाटील हे योद्धा संशोधक असून पारंपरिक व कोणत्याच चळवळींना न पेलणारे असे ते व्यक्तिमत्त्व आहे. त्यांनी वैचारिक कुस्ती कधी सोडली नाही, अशा शब्दात प्रा. एन. डी. पाटील यांनी प्राच्यविद्यापंडित कॉम्रेड शरद पाटील (धुळे) यांच्या कार्याचा गौरव केला.
येथील रा. ना. चव्हाण प्रतिष्ठानचा अठरावा महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुरस्कार प्रदान सोहळा संपन्न झाला. या प्रसंगी प्रा. एन. डी. पाटील बोलत होते. अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकत्रे डॉ. बाबा आढाव होते. याप्रसंगी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष अभयकुमार साळुंखे, डॉ. नागनाथ कोत्तापल्ले, डॉ. सदानंद मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
सत्यशोधक विचारवंत दलितमित्र रा. ना. चव्हाण यांच्या २१ व्या स्मृतिदिनी हा पुरस्कार कॉम्रेड शरद पाटील यांना प्रदान करण्यात आला. शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. प्रकृती अस्वास्थ्यामुळे पाटील कार्यक्रमास येऊ न शकल्याने त्यांच्या वतीने हा पुरस्कार सरोज कांबळे आणि रणजित परदेशी यांनी स्वीकारला.
एन. डी. पाटील पुढे म्हणाले, महर्षी शिंदे यांचे कार्य डोळ्यापुढे ठेवून रा. ना. चव्हाण यांनी कार्य केले. त्यांनी आपली लेखणी व वाणी समाजासाठीच वापरली. महर्षी शिंदे यांचे ऋण महाराष्ट्रावर व देशाच्या बऱ्याच मोठय़ा भागावर आहे. महात्मा गांधींच्या पूर्वी चौदा वष्रे त्यांनी अस्पृश्यता निवारणाचे कार्य हाती घेतले. शिंदे व महात्मा गांधी यांच्यात प्रसंगी मतभेद झाले. शिंदे यांनी अस्पृश्यतेच्या उच्चाटनालाच प्राधान्य दिले. महर्षी शिंदे यांच्यानंतर त्यांच्याच तोलामोलाचे कार्य शरद पाटील करीत आहेत.
डॉ. आढाव म्हणाले, चळवळ थांबलेली नाही व ती कोणी थांबवूही शकणार नाही. आज देशातील पंचेचाळीस कोटी लोक असुरक्षित व असंघटित आहेत. जाती अंताचा संस्कार करणारा भाग शिक्षणक्रमात येत नाही, ही बाब गंभीर आहे. विषमता संस्कारात अडकली आहे. चांगले काम करण्यासाठी वाईट साधने वापरू नयेत हा महात्मा फुले यांनी दिलेला मोलाचा संदेश आहे.
याप्रसंगी सरोज कांबळे, प्रा. रणजीत परदेशी यांचेही भषण झाले. यावेळी रमेश चव्हाण संपादित व डॉ. श्रीराम गुंजेकर लिखीत रा. ना. चव्हाण यांचे विचारविश्व या महाग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. प्रतिष्ठानचे विश्वस्त प्रा. संभाजीराव पाटणे यांनी प्रास्ताविक केले.  रवींद्र चव्हाण, रमेश चव्हाण, सतीश कुलकर्णी, पृथ्वीराज चव्हाण व श्रीमती लीलाताई खामकर यांनी स्वागत केले. रमेश चव्हाण यांनी आगामी प्रकाशित होणाऱ्या पुस्तकांची माहिती दिली. डॉ. श्रीराम गुंदेकर यांनी ग्रंथनिर्मितीमागील भूमिका विषद केली. सतीश कुलकर्णी यांनी रा. ना. चव्हाण व शरद पाटील यांच्या विचार व लेखन कार्याची मीमांसा केली. कल्पना चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले. शरद चव्हाण यांनी आभार मानले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा