MPSC students meets Sharad Pawar: “पुण्यात एमपीएससीचा अभ्यास करत असताना आपली स्पर्धा परिक्षेत निवड होऊ शकत नाही, असे वाटल्यानंतर काही विद्यार्थी पुण्यातच चहाचा व्यवसाय सुरु करतात”, अशी भावना एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यासमोर बोलून दाखविली. त्यानंतर शरद पवार यांनी एमपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांना करिअरसाठी इतर मार्गाचांही अवलंब करावा, असा सल्ला दिला. शरद पवार यांनी एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचा प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेतला होता. त्यानिमित्त पवार यांचे अभिनंदन व्यक्त करण्यासाठी एमपीएससीचे अनेक विद्यार्थी आज मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे आले होते. यावेळी एमपीएससीच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधत असताना शरद पवारांनी करिअरच्या विषयासंबंधी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
शरद पवार म्हणाले, “तुम्ही सरकारी नोकरीत जाऊ इच्छिता, ही चांगली बाब आहे. पण त्यासोबत विद्यार्थ्यांनी इतर मार्गही शोधले पाहीजेत. एमपीएससी शिवाय अनेक पर्याय आहेत, तिथे विद्यार्थ्यांनी प्रयत्न करायला हवे आहेत. स्टार्टअपसाठी सरकारच्या अनेक योजना आहेत. त्याचा लाभ विद्यार्थ्यांनी घ्यायला हवा”, असा सल्ला शरद पवार यांनी दिला. यावेळी काही विद्यार्थ्यांनी स्टार्टअपसाठी कर्ज मिळत नाही, अशी तक्रार बोलून दाखवली. त्यानंतर पवार यांनी लागलीच या विषयातील जाणाकर व्यक्तीला फोन लावून उद्योग उभारण्यासाठी सरकारच्या कोणकोणत्या योजन आहेत, याची माहिती मिळवून ती लगेच विद्यार्थ्यांना दिली.
MBBS केलेले विद्यार्थी MPSC का करतायत? पवारांचा प्रश्न
यावेळी विद्यार्थ्यांनी एमपीएससीमध्ये आता डॉक्टर, इंजिनिअर झालेले विद्यार्थी देखील येत असल्याकडे पवार यांचे लक्ष वेधले. शरद पवार यांनी MBBS केलेले विद्यार्थी MPSC कडे का वळतायत? असा प्रश्न विचारला. वैद्यकीय ज्ञान संपादन करण्याचा खर्च अधिक असतो, इतके ज्ञान संपादन करुन एमपीएससीकडे जाणे योग्य नसल्याचे मत पवार यांनी व्यक्त केले. एमबीबीएस झालेल्या विद्यार्थ्यांनी प्रॅक्टिस करायला हवी, असेही पवार म्हणाले.
हे वाचा >> विश्लेषण : ‘एमपीएससी’ परीक्षार्थींचे म्हणणे नेमके काय? या वादाआडून राजकारण होत आहे का?
पुण्यात येणारी मुलं कुठून येतात? कशी राहतात?
यावेळी शरद पवार यांनी पुण्यात अभ्यासाला येणाऱ्या विद्यार्थ्यांची माहिती घेतली. राज्यभरातून एमपीएससीचा अभ्यास करण्यासाठी विद्यार्थी पुण्यात येत असतात. अशावेळी त्यांच्या हॉस्टेलसाठी किंवा घर भाड्याने घेण्यासाठी किती हजारांचा खर्च येतो, मेस कुठे आहे? त्याला किती पैसे लागतात. साधारण किती वर्ष विद्यार्थी परिक्षा देत असतात? याबाबत सर्व माहिती शरद पवार यांनी जाणून घेतली.
कोणत्या मुद्दयावरुन MPSC च्या विद्यार्थ्यांचे आंदोलन
MPSC चा नवा अभ्यासक्रम २०२५ सालापासून लागू करण्यात यावा यासाठी विद्यार्थी गेले अनेक दिवस आंदोलन करत होते. या निर्णयाबाबतची माहिती एमपीएससीने ट्विटरवर दिली आहे. एमपीएससीने आपल्या ट्वीटमध्ये “राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या वर्णनात्मक स्वरूपाच्या परीक्षेसंदर्भातील उमेदवारांची मागणी, कायदा व सुव्यवस्थेची निर्माण झालेली परिस्थिती व उमेदवारांना तयारीसाठी द्यावयाचा अतिरिक्त कालावधी विचारात घेऊन सुधारित परीक्षा योजना व अभ्यासक्रम सन २०२५ पासून लागू करण्यात येत आहे,” असे सांगितले आहे.