अजित पवारांसह जवळपास ४० आमदारांनी बंडखोरी केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली आहे. पक्षात फूट पडल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात शनिवारी पुण्यात गुप्त बैठक पार पडली. या बैठकीनंतर राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, बैठकीच्या ठिकाणी उपस्थित असणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शरद पवार आणि अजित पवार यांच्यात नेमकी काय चर्चा झाली, हे मला माहीत नाही. मी शरद पवारांबरोबर बैठकीच्या ठिकाणी गेलो होतो, त्यानंतर लगेच तिथून निघून आलो, अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिली. ते पंढरपूर येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.

शरद पवार-अजित पवार यांच्यातील भेटीवर भाष्य करताना जयंत पाटील म्हणाले, “मी शरद पवारांबरोबर तिथे गेलो आणि लगेच निघून आलो. दोघांमध्ये काय चर्चा झाली? हे मला माहीत नाही. महायुतीत सामील होण्याबाबत मी आधीच माझी भूमिका स्पष्ट केली आहे. ईडीचा आता विषयच नाही. त्यामुळे ईडीची नोटीस आणि या बैठकीचा काही संबंध नाही.”

हेही वाचा- शरद पवार-अजित पवार गुप्त भेटीविषयी देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

“माझ्या भावाला इडीची नोटीस आली आहे. एका कंपनीच्या संदर्भात ही नोटीस होती. याबाबत माझ्या बंधूंनी चार दिवसांपूर्वी ईडीच्या चौकशीला हजेरी लावली आहे. त्यामुळे याचा आणि कालच्या भेटीचा काहीही संबंध नाही” असंही पाटील म्हणाले.

राष्ट्रवादीमधील फुटीवर जयंत पाटलांनी पुढे सांगितलं की, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कुठे फूट पडली आहे? सगळेच शरद पवारांचा फोटो लावत आहेत. सगळेच आम्ही शरद पवारांबरोबर काम करतोय, असं म्हणतायत. त्यामुळे अजून तरी फूट पडली आहे, असं दिसत नाही. तेच निवडणूक आयोगाला कळवलं आहे.”

हेही वाचा- “लपून छपून भेटी-गाठी करायच्या…”; पवार काका-पुतण्यांच्या भेटीबाबत सुषमा अंधारे स्पष्टच बोलल्या!

तुम्ही काही दिवसांत मंत्रिमंडळात दिसणार आहात, अशी चर्चा आहे. तुम्हाला भाजपाकडून ऑफर आहे का? यावर जयंत पाटील म्हणाले, “अशा चर्चा कायम सुरू असतात. कोणताही आमदार कधीही मंत्री होऊ शकतो, अशा आशयाच्या बातम्या समोर येत आहेत. मात्र, या बातम्या तुम्ही मनावर घेऊ नका.”

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sharad pawar and ajit pawar meeting in pune jayant patil first reaction rmm
Show comments