शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा आज स्मृतिदिन आहे. त्यांच्याविषयीचे अनेकांगी किस्से दंतकथासारख लोकांच्या ओठी आहेत. त्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि बाळासाहेबांमधली मैत्री महाराष्ट्राला परिचयाची आहे. शरद पवारांना बाळासाहेब शरदबाबू म्हणायचे. असो. तर बाळासाहेबांनी ‘मार्मिक’ मासिक सुरू केलं हे कुणीही सांगेल. पण, शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे यांनी आंतरराष्ट्रीय मासिक सुरू केलं होत. नाव होत राजनीती!

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

घटना आहे १९६० मधील. ‘फ्री प्रेस जर्नल’मध्ये बाळासाहेब ठाकरे हे व्यंगचित्रकार म्हणून नोकरी करायचे. पण, अचानक त्यांनी ही नोकरी सोडली. त्यानंतर बाळासाहेबांनी कधी नोकरी केली नाही. पण शरद पवार, भा. कृ. देसाई, शशीशेखर वेदक यांच्यासोबत एक आंतरराष्ट्रीय दर्जाचं मासिक सुरू केलं होतं. (भा.कृ. देसाई हे रामकृष्ण बजाज यांचे सचिव होते. त्याचबरोबर ‘शिवसेने’च्या स्थापनेत बाळासाहेबांसोबत वैचारिक बैठका त्यांनी घेतल्या होत्या. त्यांचं मराठी आणि इंग्रजी भाषेवरही चांगल प्रभुत्व होतं.) बाळासाहेबांसह चौघांनी मासिक सुरू करण्याचा निर्णय पक्का केला.

मासिकात काय असावं. नसावं. यासाठी चर्चा बैठका सुरू झाल्या. अखेर मासिकाच नाव ठरलं, राजनीती. मासिकाच्या मार्केटिंग, डिझाईनपासून सगळ्या गोष्टी निश्चित झाल्या. मासिकाचा पहिला अंक जवळपास पूर्ण झाला आणि बाळासाहेबांनी तिघांजवळ एक आयडिया बोलून दाखवली. बाळासाहेबांच्या एका भगिनीच्या अंगात यायचं आणि त्या जे सांगतील ते खरं ठरत असं मानल जायचं, हे बाळासाहेबांनी शरद पवार इतर दोन सहकाऱ्यांना सांगितलं. मग मासिक कधी प्रकाशित करायचं यांचा निर्णय घेण्यासाठी चौघेही बाळासाहेबांच्या त्या भगिनीकडं गेले.

अंक प्रकाशित करण्यासाठी त्यांनी तारीख सांगितली. त्याचबरोबर पहिली पत्रिका सिद्धिविनायकासमोर ठेवण्याचा सल्ला त्यांनी दिला. विशेष म्हणजे मासिकाला उज्ज्वल भवितव्य असून, एकही प्रत बाजारात शिल्लक राहणार नाही, असंही त्यांनी सांगितलं. दिलेल्या सल्ल्याच पालन करत चौघांनी प्रत्येक गोष्ट केली. त्यानंतर बाजारातील कोणत्याही स्टॉल मासिक दिसत नव्हतं. मग चौघांनी चौकशी केली. तर कळल की, त्या मासिकाची कुणीच मागणी न केल्यानं त्या विक्रेत्यांच्या कपाटात पडून आहेत. त्यानंतर चौघांना “बाजारात एकही प्रत राहणार नाही,” या भाकिताचा अर्थ कळला. हा किस्सा खुद्द शरद पवार यांनीच आपल्या राजकीय आत्मचरित्रात सांगितला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sharad pawar and balasaheb thackeray started international magazine bmh