मुंबई क्रिकेट संघटनेच्या निवडणुकीत भाजपचे गोपीनाथ मुंडे आणि शरद पवार एकमेकाविरुद्ध उभे ठाकले असतानाच भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांच्या पूर्ती समूहाच्या कार्यक्रमात केंद्रीय कृषीमंत्री शरद पवारांना निमंत्रित करण्यात आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. यानिमित्ताने गडकरी-पवार वर्षभरानंतर पुन्हा एकाच व्यासपीठावर दिसणार आहेत. वर्धा मार्गावरील हॉटल सन अँड सँडमध्ये उद्या, शनिवारी पूर्तीतर्फे शेतक ऱ्यांसाठी कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून पूर्तीच्या कार्यक्रमात हजेरी लावण्याची पवारांची ही दुसरी वेळ राहील.
नितीन गडकरी आणि शरद पवार यांच्यातील मैत्र जगजाहीर आहे. गेल्यावर्षी रेशीमबाग मैदानावर गडकरींनी आयोजित केलेल्या ‘अ‍ॅग्रो व्हिजन’मध्ये शरद पवार आवर्जून उपस्थित होते. गडकरी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष असताना त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्याने अध्यक्षपदाची दुसरी टर्म मिळण्याची संधी हुकली होती. परंतु, शरद पवार मात्र गडकरीच्या पाठिशी असल्याचे चित्र होते. कृषीविषयक कार्यक्रमाच्या निमित्ताने पवारांचे मार्गदर्शन घेण्याची संधी गडकरी सोडत नाहीत. मैत्र जपण्याचाच एक भाग म्हणून पवारांना पूर्तीच्या कार्यक्रमासाठी खास निमंत्रित करण्यात आले आहे.
पूर्तीच्या सभासदांना मार्गदर्शन करण्यासाठी गडकरींनी थेट पवारांनाच साकडे घालणे यातील ध्वनित अर्थ लोकसभा निवडणुकीत गडकरींना पवारांकडून मदतीचा हात अपेक्षित आहे, असा काढला जात आहे. लोकसभेच्या रिंगणात गडकरी पहिल्यांदाच उतरणार असल्याने संसद प्रवेशाचा मार्ग मोकळा करून घेण्यासाठी गडकरी आता पूर्ण ताकदीनिशी कामाला भिडले आहेत. गडकरींच्या विरोधात काँग्रेसचा उमेदवार कोण राहील, याबाबत अनिश्चितता आहे. परंतु, विलास मुत्तेमवारांना पुन्हा उमेदवारी मिळाल्यास पवारांचा छुपा पाठिंबा मिळण्याच्या दृष्टीने ते गडकरींसाठी फायदेशीरच राहील. कारण, मुत्तेमवारांची प्रतिमा पवारविरोधक अशीच आहे. पवारांनी काही दिवसांपूर्वी केलेल्या वर्धा दौऱ्यात खासदार दत्ता मेघेंच्या कार्यक्रमांना आवर्जून हजेरी लावली होती. मेघे आणि पवारांचे मध्यंतरी बिनसलेले संबंध आता रुळावर आले आहेत. मेघेंचे पुत्र सागर यांना लोकसभा निवडणुकीत तिकीट मिळाल्यास त्यांच्या पाठिशी उभे राहण्याचे सूतोवाच पवारांनी केले होते.  

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा