नगरःउपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पारनेरमध्ये आज, सोमवारी आयोजित केलेल्या कार्यक्रमात, राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजितदादा गट) फलकावर पुन्हा जेष्ठ नेते शरद पवार व खासदार सुप्रिया सुळे यांची छायाचित्रे झळकवण्यात आली. याला निमित्त होते अजितदादा गटाचे आमदार निलेश लंके यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे.
राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी अजितदादा गटाला त्यांची छायाचित्रे वापरण्यास मनाई केली आहे. अन्यथा कायदेशीर कारवाईचा इशाराही दिला आहे. त्यानंतर काही दिवसांपूर्वी नाशिकमध्ये आयोजित केलेल्या अजित पवार यांच्या कार्यक्रमाच्या फलकावरून शरद पवार यांची छायाचित्रे हटवण्यात आली व तेथे दिवंगत माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची छायाचित्रे लावण्यात आली. या बदलाचा मोठा गावगवा झाला.
हेही वाचा >>>“पालकमंत्री म्हणून मला अतिशय…”, चंद्रकांत पाटलांनी व्यक्त केली खदखद
अजितदादा गटाचे मंत्री धनंजय मुंडे यांनी शरद पवार यांना कायदेशीर कारवाई करण्याची संधी उपलब्ध होऊ नये, यासाठी हा बदल केल्याचे स्पष्ट केले तर खासदार सुप्रिया सुळे यांनी केवळ यशवंतराव चव्हाण यांचे छायाचित्र लावून त्यांचे विचार आत्मसात होणार नाहीत, चव्हाण यांना भाजपबरोबरची संगत पसंत पडली नसती, असा टोला लगावला होता.
या पार्श्वभूमीवर आज पारनेरमध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यक्रमात अजितदादा गटाच्या फलकावर पुन्हा एकदा शरद पवार व सुप्रिया सुळे यांची छायाचित्रे झळकवली गेली आहेत. आता या बदलामुळे शरद पवार कोणती कारवाई करणाऱ याबद्दल उत्सुकता व्यक्त केली जाते.
हेही वाचा >>>“भविष्यात शिवसेना गर्व से कहो MIM हैं बोलेल”, शेलारांच्या टीकेला ठाकरे गटातील नेत्या प्रत्युत्तर देत म्हणाल्या…
आमदार निलेश लंके दरवर्षी नवरात्रात पारनेर तालुक्यातील महिलांना मोहटादेवी दर्शन सहल आयोजित करतात. या सहलीची सुरुवात उपमुख्यमंत्री पवार यांच्या उपस्थितीत आज करण्यात आली. त्यानिमित्ताने उभारण्यात आलेल्या व्यासपीठावरील फलकावर शरद पवार व सुप्रिया सुळे यांचे छायाचित्र झळकवले गेले होते. उपमुख्यमंत्री पवार यांच्या स्वागतासाठी आमदार लंके यांनी ५०१ किलोचा हार व २४ जेसीबीमधून पुष्पवृष्टी केली.
आरक्षण मागणीमुळे सामाजिक स्वास्थ्य बिघडू लागले
सभेत बोलताना उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, सध्या वेगवेगळी लोक, समाज आरक्षण मागत आहेत. आरक्षण प्रत्येकाचा अधिकार आहे. परंतु पुरोगामी महाराष्ट्रात, शाहू-फुले- आंबेडकरांचा वारसा जपत असताना या आरक्षण मागणीमुळे व मोर्चामुळे सामाजिक स्वास्थ्य बिघडत चालले आहे. जातीजातीमध्ये अंतर वाढत आहे. यामध्ये राजकारण न करता सामाजिक स्वास्थ्य राखण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न करणे आवश्यक आहे.
पारनेरमध्ये १५०० कोटींची कामे
आमदार निलेश लंके यांच्या मतदारसंघात आत्तापर्यंत ११०० कोटी रुपयांची विकासकामे करण्यात आली. पुढील वर्षभरात एकूण १५०० कोटी रुपयांची विकासकामे होतील असे आश्वासन उपमुख्यमंत्री पवार यांनी दिले. जागरूक लोकप्रतिनिधी कसा असावा तर तो निलेश लंकेसारखा असावा असे कौतुकही उपमुख्यमंत्री पवार यांनी केले.