Ajit Pawar New Office In Mumbai: राष्ट्रवादी काँग्रेस पुढील सर्व निवडणुका भाजपा-शिंदे गटाबरोबरच लढणार का यावर पत्रकार परिषदेत अजित पवार यांनी विधानसभा, लोकसभा निवडणुका आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून घड्याळ या पक्षचिन्हावरच लढवणार आहोत असे म्हणत आपण राष्ट्रवादी सोडणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. आता अजित पवार यांनी पक्षाचं नवं कार्यालय देखील घेतलं आहे. मंत्रालयाच्या समोरच असणारा A/5 बंगला हा आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नवे कार्यालय असणार आहे. आज, मंगळवारी अजित पवार आणि प्रफुल पटेल यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीच्या कार्यालयाचे उदघाटन झाले असून यावेळचा एक व्हिडीओ सध्या तुफान चर्चेत आहे.
अजित पवार व शरद पवार यांच्या नात्यात अजूनही फूट पडलेली नाही हे दाखवणारा असा हा व्हिडीओ आहे. यामध्ये राष्ट्रवादीच्या नवीन कार्यालयात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा फोटो लावल्याचे दिसतेय. मात्र राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी या व्हिडिओवरूनही अजित पवारांवर निशाणा साधला आहे. “मी ज्या पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष आणि जयंत पाटील प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांनीच आमचे फोटो वापरावे. ज्यांनी आमच्या विचारसरणीचा विश्वासघात केला त्यांनी माझा फोटो वापरू नये, माझा फोटो कुणाला वापरू द्यायचा हा माझ्या हयातीत तरी माझाच निर्णय आहे “असे त्यांनी ठामपणे सांगितले
हे ही वाचा<< अजित पवारांना गद्दार म्हणणार का? सुप्रिया सुळे म्हणाल्या, “जिथे पक्षाचा प्रश्न येईल तिथे…”
दुसरीकडे नाशिकमध्ये राष्ट्रवादी पक्षाचं कार्यालय कुणाचं यावरून शरद पवार समर्थक गट आणि अजित पवार समर्थक गटात राडा झाला आहे. अजित पवारांच्या गटाने सकाळपासून कार्यालयात ठाण मांडून कार्यालयावर दावा केला. यानंतर शरद पवारांच्या गटाने कार्यालयासमोरच ठाण मांडून आंदोलन केलं. तसेच जोरदार घोषणाबाजी केली, असे समजत आहे.