राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज ‘लोक माझे सांगाती’ या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्यात पक्ष अध्यक्ष पदाचा राजीनामा देत असल्याचं जाहीर केलं आहे. शरद पवार यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे राष्ट्रवादी काँग्रेससह संपूर्ण महाराष्ट्रालाच एक धक्का बसला आहे. कारण शरद पवार असा काही निर्णय घेतील ही अपेक्षा नव्हती. मात्र हा निर्णय त्यांनी घेतला आहे. कार्यकर्त्यांनी त्यांना बराच आग्रह केला की निर्णय मागे घ्या. मात्र त्यांनी निर्णय मागे घेतला नाही. त्यानंतर संध्याकाळी अजित पवारांसोबत त्यांनी निरोप पाठवला आहे की मी यावर विचार करेन आणि दोन-तीन दिवसात भूमिका जाहीर करेन. मात्र आज जे घडलं त्यानंतर शरद पवार यांना निर्णय मागे घेण्यासाठीचं आवाहन मोठ्या प्रमाणावर केलं जातं आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनीही एक भावनिक पत्र शरद पवार यांना लिहिलं आहे.
काय आहे सुषमा अंधारे यांची पोस्ट?
आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब
अध्यक्ष , राष्ट्रवादी काँग्रेस</strong>
सर नमस्ते,
खरंतर मी आपल्याला लिहावे किंवा सांगावे एवढी प्रज्ञा निश्चितच माझी नाही. पण तरीही सर, मोठ्या धाडसाने हे लिहिले पाहिजे. मी आपल्या पक्षाची कधीच साधी प्राथमिक सदस्य ही नव्हते. पण आपला निर्णय एकूणच फक्त पक्ष म्हणुनच नाही तर, महाराष्ट्रातील बहुजन उपेक्षित तळागाळातील अठरापगड जातीची बुज असणारा नेता म्हणून ज्यांना जाण आहे त्या कोणालाही मानवणार नाही.
सर , बदल हा सृष्टीचा नियम असतो जे काल होते ते आज असेलच असे नाही जे आज
आहे ते उद्या राहीलच असे नाही पण असे असले तरी काही गोष्टीत लोकांना बदल अजिबातच मान्य नसतो महाराष्ट्राच्या बुजुर्ग व्यक्ती म्हणून आपला हा निर्णय अजिबातच न पटणारा आहे.
सर, कदाचित आपल्या नंतर आपल्या पक्षाला अध्यक्ष मिळतील आणि ते खूप निष्ठेने आणि प्राणपणाने पक्ष वाढीसाठी काम करतील ही पण सर , माझ्यासारखी अत्यंत तळागाळातून आलेली मुलगी असेल, मोतीराज राठोड असतील, व्यंकप्पा भोसले असतील, इचलकरंजीचे पवार असतील, निलंग्याचे विलास माने असतील ही माणसं आपण उभी केलीत.
कुणी काहीही म्हटलं तरी रामदास आठवले हे नेतृत्व पहिल्यांदा आपल्या पारखी डोळ्यांनी हेरले. आपल्या पुढाकारामुळेच पहिल्यांदा आंबेडकरी चळवळीतले चार खासदार एकत्रितपणे निवडून आले.
सर, एकीकडे ना. धो. महानोर यांच्यासारखे शेतीमातीशी नाळ असणारे जाणकार साहित्यिक आपल्या सभागृहात असले पाहिजे तर दुसरीकडे तीन दगडाच्या चुलीवरचे अन्न शिजवून खाणारे आणि जन्मभर भटकंती केली तरी मेल्यावर स्मशानभूमीचा प्रश्न उरावा अशा भीषण दुर्भिक्षातून उभे राहिलेले लक्ष्मण मानेंसारखे लोकही सभागृहात असावे हा सामाजिक अभियांत्रिकीचा प्रयोग आपण केला.
सर, शेतीच्या सातबारावर घरातल्या पुरुषाइतकेच माय माऊलीचे सुद्धा नाव असले पाहिजे हा क्रांतिकारी निर्णयसुध्धा आपल्याच काळातला ! सर, कोणताही पक्ष किंवा संघटना चालवण्यासाठी चार गुणांची चतुसूत्री एकत्र असणे अत्यंत गरजेचे असते .
एक नेतृत्व , दोन वक्तृत्व , तीन विचारधारा , चार संघटन कौशल्य. आपल्या ठायी या चारही गुणांचा संगम आहे हे सत्य महाराष्ट्रात काय भारतातला कोणीही नाकारता येणार नाही.
शतकातला नेता म्हणूनही आपला एक वेगळा उल्लेख आहे. आपल्या निर्णयाने राष्ट्रवादी पक्षाचे काही नुकसान होत आहे का किंवा आपल्यानंतर या पक्षाचे नेतृत्व करण्यास कुणी सक्षम आहे किंवा नाही या सगळ्या बाबींमध्ये जाण्याची अजिबातच इच्छा नाही.
…… पण आपला अनुभव प्रश्न हाताळण्याचे हातोटी, कमालीचा संयम या सगळ्यांची आज गरज आहे एकूणच महाराष्ट्र आणि देश ज्या संक्रमण काळातून जात आहे त्या संक्रमण काळात हुकूमशाही आणि दमण यंत्रणेच्या विरोधात लढण्यासाठी महाराष्ट्राला एका ज्येष्ठ बुजुर्गाचे नुसते आशीर्वादच नाही तर मुत्सद्दी राजकारणाचा अनुभव आणि दिशादर्शक मार्गदर्शनही हवे आहे.
प्रा. सुषमा अंधारे
एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शरद पवार यांना निर्णय मागे घेण्यासाठी साद घातली आहे. तर दुसरीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी अशा पद्धतीने भावनिक पत्र लिहून शरद पवारांना राजीनामा मागे घेण्याचं आवाहन केलं आहे.