राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक शरद पवार यांनी २ मे रोजी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. पक्षाचा अध्यक्ष नियुक्त करण्याकरता त्यांनी समितीही स्थापन केली होती. मात्र, कार्यकर्ते, नेते, पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या राजीनाम्याला विरोध दर्शवला. त्यांनीच स्थापन केलेल्या समितीने त्यांचा राजीनामा फेटाळून लावला. या सर्व पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी आपला राजीनामा मागे घेतला आहे. आज सायंकाळी पत्रकार परिषद घेऊन शरद पवारांनी राजीनामा मागे घेत असल्याची घोषणा केली. मात्र, या पत्रकार परिषदेत अजित पवार गैरहजर होते.
राष्ट्रवादीचे सर्वोसर्वा शरद पवार यांनी राजीनामा दिल्यानंतर अजित पवार फ्रंटफूटवर आले होते. कार्यकर्त्यांना समजावण्यापासून ते सुप्रिया सुळेंना दम देण्यापर्यंत अजित पवारांनी परिस्थिती हाताळण्याचं काम केलं. कोणाही कार्यकर्त्याने, नेत्याने हट्टाला पेटू नये, असं आवाहन करत त्यांनी सर्वांना शांत राहण्यास सांगितलं. लोक माझे सांगाती पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
हेही वाचा >> VIDEO: मोठी बातमी! शरद पवारांकडून राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय रद्द; म्हणाले…
शरद पवारांनी राजीनामा दिल्याने पक्षाची धुरा आता सुप्रिया सुळेंकडे जाणार की अजित पवारांकडे यावर राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागली होती. दरम्यान, पक्षाचे राष्ट्रीय नेतृत्त्व सुप्रिया सुळेंकडे आणि राज्याची जबाबदारी अजित पवारांकडे सुपूर्द केली जाईल, असे तर्कही लढवले गेले. आज यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये समितीची बैठक झाली. या बैठकीत शरद पवारांच्या राजीनामा फेटाळण्याचा ठराव करण्यता आला. हा ठराव समितीतील सर्व सदस्यांनी एकमताने मंजूर केला. त्यामुळे समितीने राजीनामा फेटाळणे आणि जनविरोध पाहता शरद पवारांनी राजीनामा मागे घेण्याचा निर्णय घेतला.
शरद पवारांनी स्वतः पत्रकार परिषद घेऊन राजीनामा मागे घेत असल्याचे निवेदन सादर केले. या पत्रकार परिषदेत रोहित पवारांसह अनेक पदाधिकारी आणि नेते उपस्थित होते. परंतु, अजित पवार या पत्रकार परिषदेत हजर राहिले नाहीत. त्यामुळे पत्रकारांनी या मुद्द्यावरून पवारांना प्रश्नही विचारला.
“पत्रकार परिषदेत सर्वजण उपस्थित नसतात. काही लोक येथे आले आहेत, काही गैरहजर आहेत. आज पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनी एकमताने निर्णय घेऊन तो निर्णय मला कळवला. त्यामुळे येथे कोण आहे आणि कोण नाही असा प्रश्न उपस्थित करणे योग्य नाही”, असं उत्तर शरद पवारांनी दिलं.