उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर नेते अजित पवार यांनी बंडखोरी केल्यानंतर ठाण्यात पक्षाचं नुकसान करणाऱ्यांना मोठं केलं जात असल्याचा म्हणत जितेंद्र आव्हाडांना लक्ष्य केलं. तसेच त्यांच्यामुळे राष्ट्रवादीचे अनेक नेते पक्ष सोडून केल्याचा गंभीर आरोप केला. याबाबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना विचारणा करण्यात आली. तेव्हा त्यांनी या आरोपावरून अजित पवारांना प्रत्युत्तर दिलं. ते शनिवारी (८ जुलै) नाशिकमध्ये बोलत होते.
शरद पवार म्हणाले, “अजित पवारांना जितेंद्र आव्हाडांनी पक्षाचं नुकसान केलं असं वाटत असेल, तर ठीक आहे. मात्र, जितेंद्र आव्हाडांनी कधीही भाजपात जायचं अशी भूमिका घेतली नाही. ज्यांनी भाजपाबरोबर जाण्याची भूमिका घेतली, त्याने पक्षाचं नुकसान झालं की, जे पक्षाशी प्रामाणिकपणे राहतात, संघर्ष करतात त्यांनी नुकसान केलं याचा विचार करायला हवा.”
“काही लोकांनी भाजपाचा प्रस्ताव दिल्यावर त्यावर चर्चा झाली”
अनेकदा चर्चा होऊन निर्णय न झाल्याने आम्ही भाजपाबरोबर जाण्याचा निर्णय घेतला या अजित पवार गटाच्या युक्तिवादावर शरद पवारांनी भाष्य केलं. ते म्हणाले, “ते म्हणतात भाजपाबरोबर २०१४, २०१७, २०१९ मध्ये चर्चा झाली, पण निर्णय झाला होता का? राजकारणात चर्चा सगळी होते. अनेक गोष्टींवर चर्चा होते. कधी डाव्या पक्षांबरोबर होते, कधी काही लोकांनी भाजपाचा प्रस्ताव दिल्यावर त्यावर चर्चा झाली.”
हेही वाचा : शरद पवारांबाबत ‘तो’ प्रश्न विचारताच जितेंद्र आव्हाडांना अश्रू अनावर, म्हणाले, “त्यांचं वय ८४ वर्षे…”
“चर्चा झाल्या याचा अर्थ निर्णय झालेला नाही”
“पक्षात चर्चा होत राहिली पाहिजे. चर्चेनंतर सामूहिक मत काय तयार होतं हे महत्त्वाचं असतं. त्यानुसार निर्णय राबवायचा असतो. अनेकवेळा अनेकबाबतीत पक्षात चर्चा झाल्या आहेत. चर्चा झाल्या याचा अर्थ निर्णय झालेला नाही. त्यामुळे जो निर्णय अंतिम आहे तोच खरा,” असंही शरद पवारांनी नमूद केलं.
अजित पवार नेमकं काय म्हणाले होते?
अजित पवार म्हणाले होते, “शरद पवार हे आपले दैवत आहे. प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ यांनी विनंती केली. त्याप्रमाणे मी साष्टांग नमस्कार करून विनंती करतो की, अजूनही मार्ग काढावा. काही आमदारांची ससेहोलपट होत होती. इकडं आड, तिकडं विहीर. पण, काही अशी लोक घेतलेत की, संघटनेचं वाटोळ करतील. तुम्ही म्हणाला कोण, उदाहरण द्यायचं झालं, तर तो ठाण्यातील पठ्ठा… त्यांच्यामुळे गणेश नाईक, संदीप नाईक, सुभाष भोईर, निरंजन डावखेरे पक्ष सोडून गेले. वसंतराव डावखेरे वयस्कर असताना म्हणायचे, शरद पवार कशाला यांना मोठं करत आहेत.”
हेही वाचा : “तो ठाण्यातील पठ्ठ्या…”, अजित पवारांनी थेट जितेंद्र आव्हाडांना केलं लक्ष्य
“आपल्यातील सहकाऱ्यांनी स्वत: नेतृत्व करत बेरजेचं राजकारण केलं पाहिजे. एका मंत्र्यांनी चार आमदार निवडून आणले पाहिजेत. पण, ठाण्यात आपले आमदार घालवणाऱ्याला नेता केलं. काही प्रवक्ते चांगल्याचं बोलून वाटोळ करतात. तशा पद्धतीचे काम ती व्यक्ती केल्याशिवाय राहणार नाही,” अशी टीका अजित पवारांनी जितेंद्र आव्हाडांवर केली होती.