शिवसेना ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पक्षाचा वारसदार तयार करण्यात अपयश आल्याचं मोठं विधान करण्यात आलं. यानंतर आता शरद पवारांना याबाबत विचारणा करण्यात आली. त्यावर शरद पवारांनी सूचक प्रतिक्रिया दिली. तसेच महाविकासआघाडीच्या ऐक्याचा उल्लेख करत अग्रलेखावर भाष्य केलं. ते सोमवारी (८ मे) सोलापूरमध्ये पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरं देत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शरद पवार म्हणाले, “सामनातील अग्रलेख माझ्या वाचनात आलेला नाही. तो वाचल्यावर मी मत व्यक्त करेन. सामना किंवा त्याचे संपादक हे सर्व लोक आम्ही एकत्र काम करतो. त्यामुळे पूर्ण माहिती घेऊनच भाष्य करणं योग्य होईल. नाही तर उगाच गैरसमज होतात. माझी खात्री आहे की, त्यांची भूमिका महाविकासआघाडीच्या ऐक्याला पोषक असेल.”

“महाविकासआघाडीत सर्व व्यवस्थित”

“मी पक्षाला वारसदार देण्यात अपयशी ठरलो हे त्यांचं मत आहे,” असं म्हणत शरद पवारांनी सामनातील टीकेवर अधिक भाष्य करणं टाळलं. महाविकासआघाडीत सर्व व्यवस्थित आहे. त्याची काळजी करण्याचं कारण नाही, असंही पवारांनी नमूद केलं.

“कोण पार्सल आहे या सगळ्यावर तिकडं बोलेन”

“निपाणीत राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार आहे. पण, हा महाराष्ट्रातील साडेतीन जिल्ह्यांचा पक्ष आहे”, अशी टीका करणाऱ्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनाही पवारांनी उत्तर दिलं. ते म्हणाले, “मी निपाणीला चाललो आहे. त्यामुळे कोण पार्सल आहे, कोण किती वर्षाचं आहे, या सगळ्यावर तिकडं सविस्तर बोलेन.”

हेही वाचा : “बाहेर देता तसं काकांकडेही लक्ष द्या”, राज ठाकरेंच्या सल्ल्यावर अजित पवारांचं प्रत्युत्तर, म्हणाले…

“सुप्रिया सुळेंवर अध्यक्षपदाची धुरा सोपविण्याचा विचार आताच नाही”

निवृत्तीबद्दल बोलताना शरद पवारांनी म्हटलं, “पक्ष आणि कार्यकर्त्यांसाठी आपण निवृत्ती मागे घेतली. पुढील वर्षातील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांपर्यंत आपण अध्यक्षपदी राहणार आहोत. सुप्रिया सुळे यांच्यावर अध्यक्षपदाची धुरा सोपविण्याचा विचार आताच करता येणार नाही,” असेही शरद पवारांनी स्पष्ट केलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sharad pawar answer criticism in saamana editorial by thackeray faction pbs
Show comments