मनसेचे सरचिटणीस आणि पुण्यातले मनसेचे मोठे नेते अशी ख्याती असलेल्या वसंत मोरेंनी दोन दिवसांपूर्वी पक्षाला सोडचिठ्ठी दिली. त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली. यावेळी त्यांनी शरद पवार यांच्यासह जाणार का? या प्रश्नाचंही उत्तर दिलं आहे. वसंत मोरे म्हणाले, “मी मागची २५ वर्षे सुरुवातीच्या कालावधीत शिवसेनेत राज ठाकरेंबरोबर काम केलं. त्यानंतर त्यांच्याबरोबर शिवसेना सोडली. पुणे शहरातला मी मनसेचा पहिला कार्यकर्ता होतो. मागील दीड वर्षांपासून मी पुण्यातून लोकसभेची निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे. परंतु, पक्षात माझ्याविरोधात कारवाया वाढल्या आहेत. ज्या लोकांवर पुणे शहराची जबाबदारी होती त्या लोकांनी जो अहवाल राज ठाकरेंकडे सादर केला, त्यात पुणे शहरात मनसेची स्थिती नाजूक आहे असं सांगण्यात आलं. माझ्याविरोधात नकारात्मक अहवाल पाठवण्यात आला. तेव्हापासून पुण्यात मनसे लोकसभा लढवू शकत नाही असा प्रचार केला गेला.
वसंत मोरे यांना यावेळी विचारण्यात आलं की, शरद पवारांबरोबर जाणार का? त्यावर मोरे म्हणाले, मी शरद पवारांची भेट घेतली होती. ती बारामतीच्या विकासकामांच्या संदर्भात घेतली होती. सुप्रिया सुळेंशीदेखील मी याच विषयावर चर्चा केली. त्यांच्याशी मी पक्षप्रवेशाबाबत काहीही बोललो नाही. शरद पवारांशी चर्चा केली. मात्र त्यांच्या पक्षात जाण्याबद्दल चर्चा केली नाही. मी येत्या दोन ते तीन दिवसांत माझा निर्णय जाहीर करेन. मला इतर पक्षांनीही ऑफर दिली आहे. मी काय करायचं हे अद्याप ठरवलेलं नाही.
हे ही वाचा >> पक्षांतरबंदी कायद्यामुळे आमदार लंकेंचा पक्षप्रवेश टळला ?
मोरे यांनी गेल्या काही दिवसांत दोन वेळा शरद पवारांची भेट घेतली आहे. त्यामुळे मोरे शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून पुणे लोकसभेचं तिकीट मिळावं यासाठी प्रयत्न करत असल्याचं बोललं जात होतं. दरम्यान, वसंत मोरेंबाबत शरद पवार यांनीदेखील भूमिका स्पष्ट केली आहे. शरद पवार यांनी काही वेळापूर्वी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. यावेळी त्यांना विचारण्यात आलं की, वसंत मोरे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत का? त्यांना राष्ट्रवादीकडून लोकसभेचं तिकीट दिलं जाणार आहे का? यावर शरद पवार म्हणाले, ती साधी भेट होती. आता तुम्ही (पत्रकार) मला भेटलात तर आपल्यात राजकीय चर्चा झाली का? त्या भेटीत वसंत मोरे यांनी काही सांगितलं नाही. आमच्यात राजकारणावर यत्किंचितही चर्चा झाली नाही. पुढे काय करावं यावर ते काही बोलले नाहीत. ते आले आणि गेले.