राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देशातील परिस्थिती पाहता ख्रिश्चन आणि मुस्लीम समाजाला धोका निर्माण झाल्याचं वक्तव्य केलं. त्यांच्या या वक्तव्याची जोरदार चर्चा सुरू आहे. यानंतर पत्रकारांनी शरद पवारांना असं वक्तव्य का केलं? त्यामागची कारणं काय? असा प्रश्न केला. यावर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते बुधवारी (७ जून) औरंगाबादमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शरद पवार म्हणाले, “मी ख्रिश्चन व मुस्लीम समाज धोक्यात आहे असं मी म्हणालो, कारण ओडिशा आणि इतर काही राज्यांमध्ये चर्चवर हल्ले झाले आहेत. चर्च आणि ख्रिश्चन समाज तसा शांतताप्रिय असतो. एखाद्याची काही चूक असेल, तर पोलीस कारवाई करावी. त्यासाठी धार्मिक स्थळावर हल्ला का करायचा.”

“त्यामागे एकट्यादुकट्याचा हात नाही”

“हे जे घडतंय ते सहजासहजी घडत नाही. त्यामागे एकट्यादुकट्याचा हात नाही, त्यामागे एक विचारधारा आहे. ती विचारधारा समाजाच्या हिताची नाही,” असं मत शरद पवारांनी व्यक्त केलं.

“मोबाईलवरील मेसेजवर लगेच रस्त्यावर उतरून धार्मिक स्वरुप देणं योग्य नाही”

देशातील दंगलींवर बोलताना शरद पवार म्हणाले, “अहमदनगर जिल्ह्यात संगमनेरमध्ये घटना घडली आहे. त्यानंतर कोल्हापूरमध्येही तणाव आहे. कुणीतरी मोबाईलवर मेसेज पाठवला. तो मेसेज चुकीचाही असेल, पण त्यासाठी लगेच रस्त्यावर उतरून त्याला धार्मिक स्वरुप देणं हे काही योग्य नाही.”

“राज्यकर्तेच रस्त्यावर उतरून समाजात कटुता निर्माण करत आहेत”

“आज सत्ताधारी पक्ष अशा सर्व गोष्टींना प्रोत्साहन देत आहे. राज्यकर्त्यांची जबाबदारी राज्यात शांतता आणि सुव्यवस्था प्रस्थापित करणे आहे. मात्र, राज्यकर्ते व त्यांचे सहकारी रस्त्यावर उतरायला लागले आणि त्यामुळे समाजात जातीत कटुता निर्माण झाली तर हे चांगलं लक्षण नाही,” असं मत शरद पवारांनी व्यक्त केलं.

हेही वाचा : भाजपा नेत्यांकडून एकेरी उल्लेख करत टीका, शरद पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया, म्हणाले…

“औरंगाबादमध्ये औरंगजेबाचा फोटो दाखवला म्हणून पुण्यात दंगल करण्याचं काय कारण?”

“समाजात कटुता निर्माण केली जात आहे. औरंगाबादमध्ये कुणीतरी औरंगजेबाचा फोटो दाखवला. त्यासाठी पुण्यात दंगल करायचं काय कारण आहे. पुण्यात आंदोलन करायचं काय कारण आहे,” असंही पवारांनी नमूद केलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sharad pawar answer why he say christian and muslims are in danger pbs