Sharad Pawar: राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष उभा होत असल्याचे चित्र दिसत आहे. जालना जिल्ह्यात वडीगोद्री येथे ओबीसींच्या आरक्षणासाठी लक्ष्मण हाके उपोषण करत आहेत. तर बाजूलाच आंतरवाली सराटी या गावात मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील सहाव्यांदा उपोषण करत आहेत. दोन्ही नेत्यांचे समर्थक आक्रमक झाल्यामुळे काहीसा तणाव पाहायला मिळत आहे. जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, जालनासह काही जिल्ह्यांत बंद पाळण्यात आला आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता त्यांनी सामंजस्याने यातून मार्ग काढला पाहीजे, असे सांगितले.
शरद पवार पुढे म्हणाले, “तणाव निर्माण होण्याचे काहीही कारण नाही. कारण आपला जात, धर्म वेगळा असला तरी आपण सर्व भारतीय आहोत. महाराष्ट्राचा आपण सर्व घटक आहोत. सर्व समाजात सामंज्यस्य कसे राहिल, याबाबतची भूमिका या विषयात जे काम करत आहेत, त्यांनी घेतली पाहीजे. राज्य सरकारने सुद्धा अशा प्रश्नांवर निर्णय घेताना लोकांना सामील करून घेतले पाहीजे. तसेच वातावरण चांगले कसे राहिल, याचीही खबरदारी घेतली गेली पाहीजे.”
हे वाचा >> आंतरवलीजवळ आंदोलकांच्या घोषणाबाजीमुळे तणाव; आंदोलन प्रतिआंदोलनाने वाद
येत्या १० दिवसांत जागावाटपावर निर्णय
विधानसभा निवडणुकीसाठी जे इच्छुक आहेत, त्यांचा अभ्यास सुरू आहे. पक्षाचे राज्याचे अध्यक्ष जयंत पाटील आणि इतर वरिष्ठ नेते त्या उमेदवारांच्या मुलाखती घेऊन अंतिम निर्णय घेतील. राज्यात मविआचे तीन पक्ष एकत्र येऊन निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे एखादी जागा तीनपैकी कोणत्या पक्षाने लढवावी, यावर विचार सुरू आहे. तीन दिवसांपासून मविआचे नेते एकत्र बसून जागावाटापावर मंथन करत आहेत. पुढच्या दहा दिवसात जागावाटपाचा मुद्दा अंतिम झालेला असेल त्यानंतर जनतेमध्ये जाऊन प्रचाराला सुरुवात केली जाईल.
मविआसाठी अनुकूल चित्र
पाच वर्षांपूर्वी २०१९ ला जेव्हा लोकसभा निवडणुका झाल्या होत्या. तेव्हा काँग्रेसचा एक खासदार निवडून आला होता. आमचे चार खासदार निवडून आले होते. यावेळी ४८ पैकी ३० लोक निवडून आले आहेत. याचा अर्थ लोक परिवर्तनासाठी उत्सुक आहेत. सत्ताधारी भाजपा आणि त्यांच्या सहकारी पक्षांना बाजूला करण्याच्या मनस्थितीत लोक आहेत. त्यामुळे एक आशादायक चित्र दिसत असून त्याबाबत आम्ही कामाला लागलो आहोत, असेही शरद पवार म्हणाले.
राज्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. राज्य सरकारने मदतीचे आश्वासन दिले असले तरी शेतकऱ्यापर्यंत काय पोहोचते? हा महत्त्वाचा भाग आहे. फार मोठा वर्ग असा आहे, ज्याच्यापर्यंत काहीही पोहोचलेले नाही. त्यामुळे तो वर्ग अस्वस्थ आहे. आम्ही थोडे दिवस थांबू, त्यानंतर मुख्यमंत्र्याना भेटून यामध्ये दुरुस्ती करण्याचा आग्रह करू.