Sharad Pawar: छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याची घटना दुर्दैवी होती यात काही शंकाच नाही. महाविकास आघाडीने हा मुद्दा उचलून धरला आहे. मुंबईत रविवारी महाविकास आघाडीने जोडे मारो आंदोलन केलं. या आंदोलनाला पोलिसांनी संमती दिली नव्हती तरीही हे आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले या महाविकास आघाडीच्या तीन प्रमुख नेत्यांचा आणि असंख्य कार्यकर्त्यांचा सहभाग होता. शरद पवार ( Sharad Pawar ) यांनी या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. पंतप्रधान मोदींच्या अंगाशी आलं की माफी मागून सुटण्याचा प्रयत्न करतात असं शरद पवार ( Sharad Pawar ) म्हणाले आहेत.

नरेंद्र मोदी नेमकं काय म्हणाले होते?

“सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ल्यावर काही दिवसांपूर्वी जे काही घडलं ते दुर्दैवी आहे. छत्रपती शिवाजी महाराज आपल्यासाठी आराध्य दैवत आहेत. त्यामुळे मी आज छत्रपती शिवाजी महाराज यांची त्यांच्या चरणांवर डोकं ठेवून माफी मागतो.” असं मोदी म्हणाले, त्यापुढे ते म्हणाले, “स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर नेहमी बोललं जातं. त्यांचा अपमान केला जातो. मात्र, विरोधकांनी कधीही माफी मागितली नाही. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा वारंवार अपमान करूनही माफी तर मागितली नाहीच. मात्र, ते न्यायालयामध्ये जातात. त्यांना कधीही याबाबत पश्चात्ताप झाला नाही किंवा होत नाही. कारण हे त्यांचे संस्कार आहेत. महाराष्ट्रातील जनता त्यांच्या संस्कारांना चांगलं ओळखते. पण आमचे संस्कार वेगळे आहेत.” यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माफी मागितली पण त्यातही राजकारण केलं अशी टीका होते आहे. आता याच माफीवर शरद पवारांनी ( Sharad Pawar ) भाष्य केलं आहे.

हे पण वाचा- शिवरायांच्या प्रेरणेने मोदी यांनी भारत बदलला!, देवेंद्र फडणवीस यांचे गौरवोद्गार

काय म्हणाले शरद पवार?

“पुतळा कोसळला आणि सांगितलं जात पंतप्रधान मोदी यांनी माफी मागितली. त्यांनी माफी मागितली आणि लगेच सांगितलं की सावरकरांवर टीका टिप्पणी केली जाते. त्यांनी कधी माफी मागितली नाही. शिवाजी महाराजांचा पुतळा पडला. विषय काय? लोकांची अस्वस्था काय? आता विषय काय आहे? हे काय बोलत आहेत? आता छत्रपती शिवाजी महाराज आणि सावरकर यांची तुलना होऊ शकते? ज्यांनी रयतेचं राज्य आणलं त्यांची तुलना कशा प्रकारे देशाचे पंतप्रधान करतात हे आपण पाहिलं. याचा अर्थ असा की चुकीच्या गोष्टी आणि चुकीच्या विचारांना प्रोत्साहित करता. अंगाशी आलं की माफी मागून सुटका करण्याचा प्रयत्न करतात” असं शरद पवार ( Sharad Pawar ) यांनी म्हटलं आहे.

मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खेद व्यक्त केला. (Photo – ANI)

मुस्लीम समाजाची स्थिती आज चिंताजनक

शरद पवार म्हणाले, “मुस्लिम समाजाची स्थिती आज चिंताजनक आहे. दारिद्र्य रेषेखाली असणाऱ्या मुस्लिमांची संख्या दुर्लक्षित करण्यासारखी नाही. शिक्षणाच्या संदर्भात मर्यादीत संधी ज्यांना मिळते, त्यामध्ये मुस्लीम समाजाचे घटक अधिक असतात. मुस्लीमांकडे द्वेषाने बघण्याचा दृष्टीकोण समाजातील काही घटकांमध्ये आहे.” असंही शरद पवार ( Sharad Pawar ) म्हणाले.