बेळगाव-कारवार आदी सीमाभागांतील मराठी माणसांचे मला कौतुक वाटते. महाराष्ट्र-कर्नाटक प्रादेशिक सीमेने पाच दशकांपूर्वी आपली ताटातूट केली असली तरी आपली मने मात्र अभंग आहेत. याचे कारण तुमची-आमची नाळ याच मराठी मातीत पुरलेली आहे. आणि नाळेचे कुणा प्रांताशी किंवा जातीशी नाते नसते, तर मातीशी असते, असे उद्गार ९५व्या नाटय़ संमेलनाचे उद्घाटक शरद पवार यांनी काढले.
आजची रंगभूमी गंभीर प्रश्नांना तोंड देत आहे. दोन-चार व्यावसायिक नाटकांना यश मिळाले म्हणजे एकूणच व्यवसाय उत्तम चालला आहे असे समजणे म्हणजे स्वत:ला फसवण्यासारखे ठरेल. या व्यवसायाला उद्योगाचे स्वरूप देण्याचा विचार व्हायला हवा. त्यासाठी अर्थकारणाची नवी मॉडेल्स तयार व्हायला हवीत. मराठी माणसावर खेकडय़ाच्या वृत्तीचा आरोप केला जातो. निर्माते, दिग्दर्शक, लेखक, कलाकार, तंत्रज्ञ यांनी आपणही अशा प्रवृत्तीचे बळी ठरणार नाही, याकडे लक्ष द्यायला हवे, असे ते म्हणाले. या भाषणात पवार यांनी सीमाबद्दल चकार शब्दही काढला नाही.
जय हिंद.. नमस्कार!
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या भाषणाच्या सीमेतून सीमावाद हद्दपार केलाच, परंतु महाराष्ट्राचा जयजयकार करण्याचेही टाळले. याआधी बेळगावातच केलेल्या एका भाषणात त्यांनी ‘जय हिंद, जय महाराष्ट्र’बरोबर ‘जय कर्नाटक’ असा नारा दिला होता. नाटय़संमेलनातील भाषणाचा शेवट करतानाही त्यांनी ‘जय हिंद’ ही घोषणा दिली. त्यानंतर ते एक निमिषभर थांबले. आता ते ‘जय महाराष्ट्र’ म्हणणार असे वाटत असतानाच त्यांनी ‘नमस्कार’ असे म्हटले आणि भाषण संपविले. नंतर उपस्थितांत चर्चा होती ती त्यांच्या या ‘राष्ट्रीय’भूमिकेचीच.

Story img Loader