राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा मेळावा षण्मुखानंद सभागृह येथे बुधवारी ( २१ जून ) पार पडला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शेती, राज्यातील कायदा सुव्यवस्था आणि अन्य प्रश्नांवरून केंद्र आणि राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवर टीकास्र डागलं. सत्ताधारी पक्षाची ताकद जिथे नाही, तिथे जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय, असा गंभीर आरोप शरद पवार यांनी राज्य सरकारवर केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शरद पवार म्हणाले, “पंतप्रधान मोदींनी सांगितलं होतं, तीन वर्षात शेतकऱ्याचं उत्पन्न डबल करू. आज ९ ते १० वर्ष झाली. अद्यापही शेतकऱ्यांचं उत्पन्न डबल झालं नाही. मात्र, शेतकऱ्यांच्या आत्महत्या डबल झाल्या आहेत. महाराष्ट्रात गेल्या पाच महिन्यात ३९१ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.”

हेही वाचा : वंचित बहुजन आघाडी आणि ‘बीआरएस’वरून अजित पवारांचा कार्यकर्त्यांना सूचक इशारा; म्हणाले…

“राज्यकर्त्यांची जबाबदारी कायदा आणि सुव्यवस्था चांगली ठेवण्याची आहे. पण, आज जाणीवपूर्वक समाजा-समाजामध्ये कटुता कशी निर्माण होईल, याची खबरदारी राज्यकर्त्यांकडून घेतली जाते. गेल्या काही महिन्यात कोल्हापूर, संगमनेर, नांदेड, अकोला, अमळनेर येथे जातीय दंगली झाल्या आहेत. महाराष्ट्र हे शांतताप्रिय राज्य आहे. मात्र, सत्ताधारी पक्षाची शक्ती जिथे नाही, तिथे जातीय तेढ निर्माण करून त्याचा लाभ राजकीय दृष्टा कसा घेता येईल, हे पाहिलं जातं,” असं शरद पवारांनी सांगितलं.

“महाराष्ट्रात ३ हजार १५२ मुली आणि महिलांचा शोध लागत नाही. एवढ्या प्रमाणात मुली आणि महिला बेपत्ता होत आहेत. तर, समाजातील भगिणींचे संरक्षण करण्यासाठी आजचे राज्यकर्ते काय करतात, हे गांभीर्याने विचार करण्याची आवश्यकता आहे,” असं शरद पवारांनी म्हटलं.

हेही वाचा : “उद्धव ठाकरेंनी बंड रोखलं असतं, पण…”, ठाकरे गटातील नेत्याचं मोठं विधान

“मणिपूरमध्ये गेले ४५ दिवस सतत दंगली होत आहेत. चीनच्या सीमेजवळील राज्यात अशाप्रकारची कायदा सुव्यवस्था झाली आहे. त्याचा गैरफायदा शेजारच्या राष्ट्राने घ्यायचं ठरवलं तर, देशाची काय परिस्थिती होईल. देशाच्या पंतप्रधानांनी कुठे जायचं, तर जावं. पण, याचा बंदोबस्त करावा,” अशा शब्दांत शरद पवारांनी बजावलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sharad pawar attacks pm narendra modi over farmer manipur ssa