गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे मोठी खळबळ उडाली होती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात कोणतीही फूट पडलेली नसून काही लोकांनी वेगळी भूमिका घेतली आहे, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या. यासंदर्भात तर्क-वितर्कांना उधाण आलेलं असताना आता खुद्द शरद पवारांनी बारामतीमध्ये माध्यमांशी बोलताना सुप्रिया सुळेंच्या वक्तव्याचं समर्थन केलं आहे. तसेच, अजित पवार आमचे नेते आहेतच, असं ठामपणे शरद पवारांनी यावेळी सांगितलं. त्यामुळे राजकीय वर्तुळात नव्याने चर्चेला उधाण आलं आहे!
काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
सुप्रिया सुळेंनी गुरुवारी पुण्यात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीसंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर उत्तर दिलं. “राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कोणतीही फूट पडलेली नाही. अजित पवार पक्षातील ज्येष्ठ नेते आणि आमदार आहेत. त्यांनी पक्षाच्या विरोधात भूमिका घेतली आहे. मात्र, त्याला फूट म्हणता येणार नाही. त्यासंदर्भात विधानसभा अध्यक्षांकडे तक्रार करण्यात आली असून, त्यावरील उत्तर अद्याप प्रलंबित आहे”, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या.
शरद पवार-अजित पवार भेटीमुळे संभ्रम
दरम्यान, काही दिवसांपूर्वी झालेल्या शरद पवार-अजित पवार भेटीच्या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळेंच्या या विधानामुळे चर्चेला सुरुवात झाली आहे. अजित पवार पुन्हा पक्षासोबत येण्यापासून शरद पवार सरकारमध्ये सामील होण्यापर्यंत सर्व प्रकारच्या शक्यता वर्तवल्या जात आहेत. या पार्श्वभूमीवर आता खुद्द शरद पवारांनी दिलेल्या प्रतिक्रियेमुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
काय म्हणाले शरद पवार?
शरद पवारांनी यावेळी सुप्रिया सुळेंच्या भूमिकेचं समर्थन केलं. “अजित पवार आमचे नेते आहेतच. त्यात काही वादच नाही. फूट पडणं याचा अर्थ काय? पक्षात फूट कधी पडते? जर पक्षातलाच एक मोठा वर्ग देश पातळीवर वेगळा झाला तर फूट पडते. आज तशी स्थिती इथे नाही. काही लोकांनी वेगळी भूमिका घेतली तर लोकशाहीत त्यांचा तो अधिकार आहे. त्यांनी वेगळा निर्णय घेतला म्हणून त्यावरून लगेच पक्षात फूट पडली म्हणायचं कारण नाही. तो त्यांचा निर्णय आहे” असं शरद पवार म्हणाले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट नव्हे, काहींचा वेगळा निर्णय; सुप्रिया सुळे यांचे स्पष्टीकरण
भाजपाची खोचक प्रतिक्रिया
दरम्यान, यासंदर्भात टीव्ही ९ शी बोलताना भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी खोचक प्रतिक्रिया दिली आहे. “शरद पवारांना अजित पवारांनी घेतलेली भूमिका पटत असेल, म्हणूनच ते असं म्हणत असतील”, असं मुनगंटीवार म्हणाले आहेत.