आर्थिक निकषाच्या आधारे आरक्षण देण्याची भूमिका घेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मराठा समाजाचा विश्वासघात केला असल्याचा आरोप विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केला. इतर मागास प्रवर्गामध्ये (ओबीसी) समावेश न करता मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळाले पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली.
आरक्षणाच्या मुद्दय़ावर गेली दहा-बारा वर्षे युवकांची माथी भडकविणाऱ्या राष्ट्रवादीने अचानक भूमिका बदलून मराठा समाजाची फसवणूक केली असल्याचे सांगून तावडे म्हणाले, निवडणुका जवळ आल्या की मराठा आरक्षणाचा मुद्दा राष्ट्रवादीकडून तापविला जातो. नागपूर अधिवेशनामध्ये राज्य सरकारने नारायण राणे यांच्या अध्यक्षतेखाली समितीची नियुक्ती केली. मात्र, या नेमणुकीचे पत्र समितीला सात महिन्यांनी मिळाले. मुदतच संपुष्टात आल्यामुळे समितीचा कोल्हापूर दौरा रद्द झाला. त्यानंतर मुदतवाढ मिळाल्यामुळे समितीचे कामकाज सुरू झाले. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांनी मराठा समाजाला आर्थिक निकषावर आरक्षण द्यावे असे सांगून पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. अन्य समाजाच्या मतांवर नजर ठेवत शरद पवार, अजित पवार, आर. आर. पाटील या नेत्यांनी दुटप्पीपणाची भूमिका घेऊन मराठा समाजाची घोर फसवणूक केली आहे. राजकीय क्षेत्र वगळून मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे ही भाजपची भूमिका आहे. ‘ओबीसी’मध्ये समावेश न करता मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यावे, ही मागणी आहे. यासंदर्भात मराठा महासंघाने केलेल्या अभ्यासपूर्ण मांडणीला भाजपचा पाठिंबा आहे. अन्य समाजाला आर्थिक निकषावर आरक्षण देण्यासंदर्भात सरकारने न्यायालयामध्ये आपली बाजू मांडावी. नारायण राणे समिती ही मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आहे की वेळकाढूपणा करण्यासाठी हे कळेलच. राज्यातील हरितक्रांतीचे जनक आणि माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जन्मशताब्दी वर्षांनिमित्त राज्य सरकारने शंभर कोटी रुपयांची तरतूद केली. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील विविध मंत्र्यांचा समावेश असलेली समितीदेखील नियुक्त करण्यात आली. पण, सरकारला केवळ ४० लाख रुपयेच खर्च करता आले आहेत. वर्ष संपताना घाईघाईने चार वसतिगृहाची कामे उरकण्यात आली. सरकार किती गंभीर आहे याचेच हे द्योतक आहे, याकडेही तावडे यांनी लक्ष वेधले. यशवंतराव चव्हाण जन्मशताब्दीसाठी तरतूद केलेल्या शंभर कोटी रुपयांतील ८०-८५ लाख रुपये खर्च झाले आहेत, असेही त्यांनी सांगितले.
भाजप-शिवसेना-रिपाइं महायुतीची लोकसभेच्या जागावाटपाची चर्चा गणपतीनंतर होईल. त्यामुळे रामदास आठवले यांच्यासाठी पंढरपूर, शिर्डी की मुंबई याचा निर्णयही नंतरच होणार असल्याचे त्यांनी सांगितले. २०१४ मध्ये युतीचे सरकार सत्तेवर आल्यानंतरच पुण्यामध्ये मेट्रो धावू लागेल, अशा शब्दांत तावडे यांनी अजित पवार यांच्या ‘मेट्रो कधी धावेल सांगता येत नाही’ या विधानाचा समाचार घेतला.
‘इशरत जहाँ’ संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलेले विधान गंभीर असल्याचे सांगून विनोद तावडे म्हणाले, अल्पसंख्याक मतांवर डोळा ठेवून त्यांनी केलेले विधान हे दहशतवादी कारवायांचे समर्थन करण्यासारखेच आहे. मतांसाठी कोणतीही भूमिका घ्यायची हेच पवारांचे धोरण आहे. पण, त्यामुळे पोलिसांचे मनोधैर्य खच्ची होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा