गेल्या काही दिवासांपासून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ हे नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. नाशिक लोकसभेच्या जागेवर छगन भुजबळांचं नाव चर्चेत होतं. मात्र, त्यानंतर त्यांनी लोकसभेच्या निवडणुकीतून माघार घेतली होती. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून छगन भुजबळ यांना राज्यसभेची उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा होती. मात्र, सुनेत्रा पवार यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे छगन भुजबळ नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यातच गेल्या काही महिन्यांपासून छगन भुजबळ हे महायुती सरकारच्या धोरणाविरोधात अनेकदा बोलल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे छगन भुजबळ यांच्या मनात नेमकं काय चाललंय? असा सवाल अनेकांनी उपस्थित केला. तसेच काही दिवसांपूर्वी छगन भुजबळ यांच्याबाबत बोलताना शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनीही मोठं विधान केलं होतं. “छगन भुजबळ यांच्या भूमिका काहीवेळा गोंधळलेल्या असतात. त्यांच्या विधानामुळे महायुतीमध्ये चलबिचल आहे”, असं संजय शिरसाट यांनी म्हटलं होतं. आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना छगन भुजबळ यांच्या नाराजीसंदर्भात पत्रकार परिषदेत प्रश्न विचारण्यात आला असता यावर त्यांनी भाष्य केलं.

हेही वाचा : “मोदींची गॅरंटी खोटी, लोकांच्या विश्वासाला…”, शरद पवारांचा हल्लाबोल; म्हणाले, “लोकसभेत दिलेले आश्वासन…”

भुजबळांबाबत शरद पवार काय म्हणाले?

शरद पवार यांनी आज पत्रकार परिषदेत विविध विषयांवर भाष्य केलं. यावेळी त्यांना प्रश्न विचारण्यात आला की छगन भुजबळांनी म्हटलं की, मी राष्ट्रवादी बरोबर आहे. दादांबरोबर नाही. त्यांच्या या विधानाचा अर्थ काय घ्यायचा? छगन भुजबळांचे परतीचे संकेत दिसत आहेत का? या प्रश्नावर बोलताना शरद पवार म्हणाले, “त्यांच्या या विधानाची पार्श्वभूमी मला काही माहिती नाही. माझी आणि त्यांची गेल्या वर्ष सहा महिन्यामध्ये भेट झालेली नाही. त्यामुळे मला त्याबाबत काही माहिती नाही”, असं शरद पवार म्हणाले.

नाराजीच्या चर्चांवर भुजबळांनी काय स्पष्टीकरण दिलं होतं?

“मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आहे. माझ्या विषयी ज्या विविध चर्चा केल्या जात आहेत, त्यामध्ये तथ्य़ नाही. मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहे आणि कायमच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राहणार आहे. मी नाराज आहे, दुसऱ्या नेत्यांना भेटलो यामध्ये तथ्य नसून नाराजीच्या चर्चा खोट्या आहे”, असं स्पष्टीकरण काही दिवसांपूर्वी छगन भुजबळ यांनी दिलं होतं.

भुजबळांबाबत सुनील तटकरे काय म्हणाले होते?

राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनीही छगन भुजबळ यांच्या नाराजीच्या चर्चांवर स्पष्टीकरण दिलेले आहे. “छगन भुजबळ नाराज नाहीत. ते कुठेही जाणार नाहीत, सुरु असलेल्या चर्चांमध्ये काहीही तथ्य नाही”,असं सुनील तटकरे यांनी म्हटलं होतं.