लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळालं. मात्र, महायुतीला अपेक्षित असं यश मिळवता आलं नाही. महाविकास आघाडीला ३० जागा तर महायुतीला १७ जागा मिळाल्या. आता महाराष्ट्रात लवकरच विधानसभेची निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. राजकीय पक्षांच्या नेत्यांनी राज्यात दौरे सुरू करत आढावा घेण्यास सुरूवात केल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अशातच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील काही आमदार राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वाटेवर असल्याच्या चर्चा काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात आहेत. आता या संदर्भात शरद पवारांना प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनीही सूचक भाष्य केलं आहे.

हेही वाचा : मराठी नव्हे इंग्रजीत… निलेश लंकेंचा संसदेत पहिला शपथविधी, शेवटी म्हणाले…

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये २०२३ मध्ये फूट पडली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट असे दोन गट निर्माण झाले. अजित पवार गट सरकारमध्ये सहभागी झाला तर शरद पवार गट विरोधी पक्षात राहिला. त्यानंतर लोकसभा निवडणुकीत शरद पवार गटाच्या ८ जागा निवडून आल्या. मात्र, अजित पवार गटाला फक्त एका जागेवर विजय मिळवता आला. यानंतर आता विधानसभा निवडणुकीच्या आधी अजित पवार गटातील काही आमदार शरद पवार गटाच्या वाटेवर असल्याचं बोललं जात आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना शरद पवारांनी मोठं विधान केलं. “सरसकट निर्णय घेणं कितपत योग्य आहे, याबाबत मला माहिती नाही. मात्र, पक्षाला मदत होत असेल तर सहकाऱ्यांना विचारून निर्णय घेऊ”, असं शरद पवारांनी म्हटलं आहे.

शरद पवार काय म्हणाले?

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील अनेकजण शरद पवार गटात येण्यास उत्सुक असल्याच्या चर्चा आहेत. यावर तुमची प्रतिक्रिया काय? या प्रश्नावर बोलताना शरद पवार म्हणाले, “सरसकट निर्णय घेणं कितपत योग्य आहे? याबाबत मला सांगता येणार नाही. मात्र, आमच्या पक्षातील जे इतर माझे सहकारी आहेत. त्यांना विश्वासात घेऊन या संदर्भातील निर्णय घेतला जाईन. मात्र, याबाबत स्पष्ट असं विधान करता येणार नाही. त्यामध्ये जे इकडे येण्यास इच्छुक आहेत, त्यांचं योगदान आणि भूमिका यावरून निर्णय घेतला जाईन”, अशी सूचक प्रतिक्रिया शरद पवारांनी आज माध्यमांशी बोलताना दिली.