“शरद पवार उदारमतवादी आहेत. पण शरद पवार हे आरक्षणासंदर्भात बोलत नाहीत. त्यांनी आरक्षणावर व्यक्त झालं पाहिजे”, असं ओबीसी आरक्षण संरक्षणार्थ उपोषणाला बसलेले प्राध्यापक, लक्ष्मण हाके यांनी म्हटलं होतं. त्यानंतर आता शरद पवारांनी त्यांची आरक्षणाबाबतची भूमिका स्पष्ट केली आहे. माजी मंत्री सूर्यकांता पाटील यांनी आज शरद पवार गटात प्रवेश केला. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना आरक्षणाबाबतची भूमिका स्पष्ट केली.

शरद पवार म्हणाले, राज्याचे मुख्यमंत्री सर्वपक्षीय लोकांची बैठक बोलाविण्याच्या विचारात आहेत. ज्याअर्थी त्यांनी पुढाकार घेतला आहे, त्याअर्थी आम्ही कुणीही या विषयात राजकारण आणण्याचा प्रश्न येत नाही. याच्यातून सामंजस्यातून पर्याय काढण्याच्या प्रयत्न करत असेल तर आमची सरकारला साथ राहिल. सामाजिक ऐक्याच्या संबंधी तडजोड नाही. ओबीसी किंवा मराठा घटक असो किंवा अन्य घटक असो त्यांच्यात एकप्रकारची दुही असणे ही राज्याच्या दृष्टीने योग्य नाही.” तसंच, काहीही करायचं, पण आमच्यात एकवाक्यता राहिली पाहिजे, असंही ते पुढे म्हणाले.

हेही वाचा >> “शरद पवार उदारमतवादी, पण ते आरक्षणाबाबत…”, लक्ष्मण हाकेंनी व्यक्त केली खंत

गेल्या अनेक महिन्यांपासून मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटलांनी आंदोलन पुकारलं आहे. तर, मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण नको म्हणून ओबीसी समाजानेही आंदोलन छेडले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर शरद पवारांनी भूमिका घेतली नव्हती, अशी टीप्पणी करण्यात आली होती. त्यानंतर आज शरद पवारांनी आरक्षण मुद्द्यावरून मौन सोडलं आहे.

लक्ष्मण हाके काय म्हणाले होते?

“मी खूप छोटा माणूस आहे. शरद पवार म्हणजे खूप अनुभवी आणि खूप धोरणं राबवणारे आहेत. शरद पवारांनी महिलांच्या आरक्षणाबाबतचे धोरण असो किंवा मंडल आयोगाबाबतची त्यांची भावना असो. त्यांना काहीजण टार्गेट करतात. मात्र, शरद पवार प्रचंड उदारमतवादी होते, पुरोगामी होते. मी जबाबदारीने सांगतो. मी त्यांच्याबाबत नकारात्मक बोलणार नाही. पण सध्याच्या परिस्थितीत शरद पवार व्यक्त होत नाहीत. याची आम्हाला खंत आहे. शरद पवार हे प्रभावी व्यक्तिमत्व आहेत. जर त्यांनी एक बैठक बोलावली तर तरुणांना अपील करू शकतात. त्याचा सकारात्मक परिणाम महाराष्ट्रातील तरुणांवर होऊ शकतो. असं काहीतरी खुळखुळा वाजवणाऱ्या माणसामुळे आत्महत्या करणाऱ्या तरुणांना रोखले पाहिजे. समजावून सांगितलं पाहिजे”, असं लक्ष्मण हाके यांनी म्हटलं.