विधान परिषद निवडणुकीचे पाचही जागांचे निकाल हाती आले आहेत. या निवडणुकीत भाजपाला मोठा धक्का बसला असून ३ जागांवर महाविकास आघाडीचं वर्चस्व राहिलं आहे. तर, नाशिकमध्ये सत्यजीत तांबे विजयी झाले आहेत. यावर आता विरोधी पक्षनेते अजित पवारांनी भाष्य केलं आहे. काँग्रेसने सत्यजीत तांबेला उमेदवारी द्यायला हवी होती. कारण, लोक नव्या चेहऱ्यांना स्वीकारतात आणि त्यांच्या पाठिशी उभे राहतात, असं मत अजित पवारांनी व्यक्त केलं आहे. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.
सध्या मोदी लाट आहे, असं वाटतं का? असे विचारले असता अजित पवार म्हणाले, “विधानपरिषद निकाल पाहिला की सुशिक्षित आणि पदवीधरांनी मोदी लाटेला महत्व दिलेलं दिसत नाही. अजून थोडा जोर लावला असता तर पाचही जागांवर महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून आला असता. तसेच, सर्वे करून उमेदवारी दिली असती, तर कोकणचीही जागा गेली नसती,” असं अजित पवारांनी सांगितलं.
हेही वाचा : राजकीय जीवनात कोणत्या चुका केल्या? अजित पवार म्हणतात, “एक मोठी चूक वाटते की २००४ मध्ये…!”
सत्यजीत तांबे प्रकरणात काँग्रेसची काय चूक झाली वाटतं? यावर अजित पवारांनी म्हटलं की, काँग्रेसने सत्यजीतचे वडिल सुधीर तांबेंना उमेदवारी द्यायचं ठरलं होतं. सुधीर तांबेंची उमेदवारी ठरली. पण, त्यांची इच्छा होती की, नवीन चेहरा म्हणून सत्यजीतला संधी द्यावी. एकदा सत्यजीतने विधासभेसाठी प्रयत्न केला, मात्र यश मिळालं नाही. युवक काँग्रेसमध्ये सत्यजीतने चांगलं काम केलं आहे. महाराष्ट्राच्या प्रश्नाचा अभ्यास करण्याची त्याची तयारी आहे. त्यामुळे सत्यजीतला उमेदवारी दिली असती, काय बिघडलं नसतं.”
सत्यजीत भाजपामध्ये जाऊ शकतात का? यावर अजित पवारांनी सांगितलं की, “मल्लिकार्जुन खरगेंना शरद पवारांनी फोन केला होता. ‘तुम्ही काँग्रेसचे अध्यक्ष आहात. माझा अनुभव आहे, त्यानुसार सत्यजीतला उमेदवारी द्यावी आणि विषय संपवून टाकावा,’ असं शरद पवारांनी खरगेंना म्हणाले होते. पण, सुधीर तांबे आणि बाळासाहेब थोरात सत्यजीतला व्यवस्थित मार्गदर्शन करतील.”
“कारण, सत्यजीतचं पूर्ण घराणं, तीन पिढ्या काँग्रेसच्या विचारसारणीचं आहे. वरिष्ठांशी सत्यजीतचे चांगलं संबंध आहेत. त्यामुळे काँग्रेसने आणि सत्यजीतने फार ताणून धरू नये. मधला एक महिन्याचा कालावधी सत्यजीतने विसरून जावा आणि काँग्रेसची सहयोगी म्हणून काम करावं, अशी माझी इच्छा आहे,” असं अजित पवार म्हणाले.