राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्लीत बोलावलेल्या विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या बैठकीवर भाजपाकडून टीका होत आहे. भाजपाचे आमदार अतुल भातखळकर, मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी या बैठकीवरुन शरद पवार आणि उपस्थित राहणाऱ्या नेत्यांना लक्ष्य केल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही निशाणा साधला आहे. “कुणी काय करावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे,” असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी बैठकीवरून पवारांना टोला लगावला आहे.
राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनासंदर्भात आज कामकाज सल्लागार समितीची बैठक घेण्यात आली. या बैठकीला हजेरी लावल्यानंतर फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शरद पवारांनी बोलावलेल्या बैठकीबद्दल भाष्य केलं. “कुणी काय करावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. कुणी कितीही मोट बांधली तरी लोकांच्या मनात मोदीच आहेत. २०२४ मध्येही मोदीच येणार आहेत. २०१९ मध्येही असाच मोट बांधण्याचा प्रयत्न झाला होता. आता पेक्षा जास्त पक्ष एकत्रं आले होते. पश्चिम बंगालमध्ये या नेत्यांनी हातात हात घालून फोटोही काढले होते. त्याचा काहीही परिणाम झाला नाही,” असं सांगत फडणवीसांनी पवारांच्या दिल्लीतील घरी होत असलेल्या बैठकीवरून टीका केली.
हेही वाचा- सरकार आहे की, तमाशा; देवेंद्र फडणवीस ठाकरे सरकारवर भडकले
“मुख्यमंत्री आघाडीतील मित्रपक्षांवर नाराज आहेत की, नाही मला माहीत नाही. पण जनता सरकारवर नाराज आहे. ही तीन पक्षांची नौटंकी आहे. पदोन्नतीतील आरक्षणावर काँग्रेसने तलवारी उपसल्या होत्या. त्याचा जीआरही निघाला, सर्व काही झालं. काँग्रेसने तलवारी म्यान केल्या असून, गप्प बसले आहेत. केवळ दाखवण्यासाठी काँग्रेस भांडत असते. सत्तेचा मलिदा खाण्यासाठीच आघाडीतील नेते भांडणाचा दिखावा करून दिशाभूल करत आहेत’, असं टीकास्त्र फडणवीस यांनी डागलं.
हेही वाचा- “फक्त हीन पातळीचे राजकारण करायचे, हिंमत असेल तर…;” काँग्रेसचं भाजपाला आव्हान!
येणार तर मोदीच! शरद पवारांनी बोलावलेल्या बैठकीवर फडणवीसांनी दिलं उत्तर https://t.co/qCx2Ba5NFu < येथे वाचा सविस्तर वृत्त #SharadPawar #Delhi #PMModi #DevendraFadnavis #BJP #NCP @Dev_Fadnavis @BJP4Maharashtra @PawarSpeaks @NCPspeaks pic.twitter.com/fi7Rc65SdG
— LoksattaLive (@LoksattaLive) June 22, 2021
सरकार पडेल त्या दिवशी पर्याय देऊ…
“राज्यातील आघाडी सरकारमध्ये कोण कुणावर नाराज आहे, याच्याशी आम्हाला काही घेणं नाही. सत्तेत येण्यासाठी आम्ही कोणताही प्रयत्न करणार नाही. हे सरकार आपल्याच ओझ्यानं पडणार आहे. ज्या दिवशी हे सरकार पडेल, त्या दिवशी आम्ही पर्याय देऊ. आम्ही जनतेला उत्तरदायी आहोत. देशाच्या ७०-७२ वर्षाच्या इतिहासात असली सरकारे चालताना दिसली नाही. पण आम्ही सरकार पाडणार नाही. जोपर्यंत विरोधी पक्षात आहोत, तोपर्यंत विरोधी पक्ष म्हणून आमची जबाबदारी सक्षमपणे पार पाडू,” असं फडणवीस म्हणाले.