शरद पवार हे पंतप्रधान होणे तर दूरच, पण यापुढे राज्याचे मुख्यमंत्रीही होऊ शकणार नाहीत, असे नमूद करत पवारांची ‘राजकीय झेप’ मर्यादित असल्याची टीका भाकपचे ज्येष्ठ नेते कॉ. ए. बी. वर्धन यांनी येथे पत्रकार परिषदेत बोलताना केली. तसेच, आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेस व भाजपा या दोंन्ही पक्षांना सत्तेचे सोपान गाठणे शक्य होणार नाही. अशा स्थितीत निर्माण होणारी राजकीय पोकळी भरून काढण्यासाठी डावे, प्रादेशिक पक्ष यांचा राजकीय उदय होईल, असे भाकीतही त्यांनी या वेळी व्यक्त केले.
आगामी लोकसभा निवडणुकीनंतर त्रिशंकू अवस्था झाल्यास पवारांना पंतप्रधानपदाची संधी मिळेल का, यावर बोलताना वर्धन यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. लोकसभेनंतरचे राजकीय चित्र स्पष्ट करताना ते म्हणाले, काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाखालील संयुक्त पुरोगामी आघाडीस ११० ते १२० जागा मिळाल्या तरी खूप झाले. मुख्य विरोधी पक्ष असलेल्या भाजपाचा देशातील भौगोलिक विस्तार लक्षात घेता त्यांनाही १५० पेक्षा अधिक जागांच्या पुढे जाता येणार नाही. अशा स्थितीत सर्व डावे, प्रादेशिक्ष पक्ष पुढे येऊन राजकीय पोकळी भरून काढण्याचे काम करतील. काँग्रेस व भाजपा या दोंन्ही पक्षांपेक्षा वेगळी राजकीय, आर्थिक, आंतरराष्ट्रीय भूमिका मांडणारी आघाडी देशातील नागरिकांना हवी आहे. त्या दिशेने आमचे प्रयत्न सुरू झालेले आहेत. संभाव्य आघाडीतील राष्ट्रवादीचे स्थान काय असणार, असे विचारता वर्धन म्हणाले, नवी दिल्लीतील परिषदेला राष्ट्रवादीचा प्रतिनिधी उपस्थित होता. शरद पवार यांच्याशी झालेल्या चर्चेवेळी त्यांना महाराष्ट्रात काँग्रेस समवेत राजकारण करीत राहिल्यास तुम्हाला देशाचे राजकारण करता येणे शक्य नसल्याचे मी स्पष्टपणे सांगितले आहे. याबाबतचा अंतिम निर्णय पवारांनीच घ्यायचा आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा