पंतप्रधान नरेंद्र मोदी २७ जून रोजी भोपाळ येथे भाजपाच्या बूथ कार्यकर्त्यांना संबोधित करत असताना त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली होती, तसेच भ्रष्टाचाराचे आरोपही केले होते. पंतप्रधान मोदी म्हणाले होते की, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीवर तब्बल ७०,००० कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप आहे. भाजपा कार्यकर्त्यांनी थोडे प्रयत्न करायला हवेत आणि राष्ट्रवादीच्या घोटाळ्यांचा मीटर वाढवायला हवा, त्यांचे इतर घोटाळे बाहेर काढायला हवेत. पंतप्रधानांच्या या टीकेला शरद पवार यांनी आज (८ जुलै) येवल्यातून (नाशिक) उत्तर दिलं.
शरद पवारांची आज येवल्यात जाहीर सभा पार पडली. यावेळी शरद पवार म्हणाले, १०-१२ दिवसांपूर्वी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक भाषण केलं. या भाषणात त्यांनी नेहमीप्रमाणे काँग्रेसवर हल्लाबोल केला. वेगवेगळे आरोप केले. हे करत असताना त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवरही आरोप केले. त्यांनी त्यांच्या भाषणात एक-दोन उदाहरणं सांगितली. भ्रष्टाचाराचे आरोप केले. मी आज राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून सांगतो, त्यांनी जे काही आरोप केले असतील, त्यात भ्रष्टाचाराचे आरोप असतील किंवा आणखी काही असेल, त्यावर त्यांनी कारवाई करावी.
शरद पवार म्हणाले, माझं देशाच्या पंतप्रधानांना जाहीरपणे सांगणं आहे की, संपूर्ण देशाची सत्ता त्यांच्या हातात आहे. ती त्यांनी लावावी आणि आमच्यापैकी कोणी जर भ्रष्टाचारात सहभागी आहे असं तुम्हाला वाटत असेल, तर तुमची असेल नसेल ती सगळी सत्ता वापरा, चौकशी करा, तपास करा आणि जो चुकीच्या रस्त्यावर गेलाय असं तुम्हाला वाटेल किंवा तुमचा तसा निष्कर्ष निघेल त्याला हवी ती शिक्षा द्या. त्यासाठी तुम्हाला आमचा पाठिंबा असेल.
हे ही वाचा >> “शरद पवार महत्त्वाचा चेहरा, पण चालणारं नाणं…”, शिंदे गटातील नेत्याचं वक्तव्य
भोपाळमधल्या सभेत बोलताना नरेंद्र मोदी म्हणाले होते, तुम्हाला गांधी परिवारातल्या मुला-मुलींचा विकास करायचा असेल तर तुम्ही काँग्रेसला मतदान करा. तुम्हाला शरद पवारांच्या मुलीचं भलं करायचं असेल तर तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला मतदान करा. मोदींच्या या टीकेला काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी उत्तर दिलं होतं. ते एका पत्रकार परिषदेत म्हणाले होते की, “पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माझ्या पक्षाविषयी मत व्यक्त केलं. ते मत व्यक्त करत असताना त्यांनी माझ्या मुलीला प्रोत्साहन द्यायचं असेल तर राष्ट्रवादी काँग्रेसला मत द्या असं म्हटलं होतं. खरं आहे ते, माझी मुलगी स्वतःच्या कर्तृत्वावर तीनवेळा संसदेत निवडून गेली आहे. एखाद्यावेळी बापजाद्यांची पुण्याई उपयोगी पडते, पण दुसऱ्या वेळी, तिसऱ्या निवडणुकीत ही पुण्याई उपयोगी पडत नाही,