Sharad Pawar on Raj Thackeray: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या निमित्ताने राजकीय वातावरण तापल्याचं पाहायला मिळत आहे. सर्वच पक्षांकडून वेगवेगळ्या मुद्द्यांवरून आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण पाहायला मिळत आहे. एकीकडे राज्यात सत्ताधारी महायुती व विरोधी महाविकास आघाडी यांच्यात सुंदोपसुंदी चालू असताना दुसरीकडे वंचित बहुजन आघाडी, मनसे व तिसरी आघाडी यांच्याकडूनही राजकीय आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही सत्ताधारी व विरोधी आघाडीतील पक्षांवर सातत्याने टीका केली आहे. शरद पवारांवर त्यांनी केलेल्या टीकेला आता खुद्द शरद पवारांनी आव्हानाच्या रुपात प्रत्युत्तर दिलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जातीयवादाची टीका आणि पवारांचं आव्हान

राज ठाकरेंनी मुलाखती व भाषणांमधून वेळोवेळी शरद पवारांना महाराष्ट्रातील जातीयवादासाठी कारणीभूत ठरवलं आहे. महाराष्ट्रात १९९८ सालापासून जातीयवाद वेगाने फोफावल्याचा दावा राज ठाकरेंनी भाषणातून केला असून त्यासाठी शरद पवार व राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना कारणीभूत ठरल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. राज ठाकरेंच्या याच आरोपांना आता शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत बोलताना प्रत्युत्तर दिलं आहे.

काय म्हणाले शरद पवार?

राज ठाकरेंनी जातीयवादाचे आरोप केल्याबाबत विचारणा केली असता शरद पवारांनी त्यावर खोचक टिप्पणी केली. “मला महाराष्ट्रात एक उदाहरण दाखवावं की मी जातीयवादी राजकारण केलं. ज्यांनी उभ्या आयुष्यात काही केलंच नाही, फक्त वक्तव्य केली, टीका-टिप्पणी केली त्यांच्या वक्तव्यावर आपण काय भाष्य करायचं? दुर्लक्ष करायचं”, असं शरद पवार म्हणाले.

पवार कुटुंबीयांचा बारामतीत वेगवेगळा पाडवा; शरद पवार गोविंदबागेत, अजित पवार काटेवाडीत नागरिकांच्या भेटीला

‘जनतेनं त्यांना एकच जागा दिली’

दरम्यान, शरद पवारांनी यावेळी राज ठाकरेंना खोचक टोला लगावला. मागील विधानसभा निवडणुकांमध्ये राज ठाकरेंच्या मनसे पक्षाचा एकमेव आमदार निवडून आला. त्याचा संदर्भ शरद पवारांनी यावेळी दिला. “महाराष्ट्राची जनता शहाणी आहे. त्यांना संपूर्ण महाराष्ट्रात एकच जागा दिली”, असं शरद पवार यावेळी म्हणाले.

अरविंद सावंतांच्या विधानावर प्रतिक्रिया

दरम्यान, ठाकरे गटाचे नेते अरविंद सावंत यांनी शिंदे गटाच्या नेत्या व मुंबादेवी मतदारसंघातील उमेदवार शायना एनसी यांच्याबाबत केलेल्या विधानावरही शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली. “काही गोष्टींत शब्द इकडचा तिकडं केला म्हणजे व्यक्तिगत हल्ला केला असं मला वाटत नाही. कारण नसताना निवडणुका समोर आल्या असताना आणि आपल्याला विजयाची संधी मिळायची शक्यता नसल्यामुळे असे प्रश्न उपस्थित करणं आणि त्यानंतर वेगळंच भाष्य करणं हे सगळं निवडणुकांना केंद्रीत मानून केलं जात आहे. पण तुम्ही कोणत्याही सहकाऱ्यांबाबत बोलताना काळजी घेतली पाहिजे हे मला मान्य आहे”, असं शरद पवार यावेळी म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sharad pawar challenges raj thackeray mns on cast based politics in maharashtra pmw