Sharad Pawar on Funds for sugar mills : “साखर कारखान्यांसाठी निधी मिळावा यासाठी मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटलो होतो. मात्र, पैशांची अडचण आहे, मला समजून घ्या, असं एकनाथ शिंदे मला म्हणाले”, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख व ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केलं आहे. काही महिन्यांपूर्वी शरद पवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटले होते. त्या भेटीआधी साखर कारखान्यांबाबत शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांशी पत्रव्यवहार देखील केला होता. त्याच भेटीबाबत शरद पवारांनी नुकताच खुलासा केला आहे. शरद पवार म्हणाले, “एकनाथ शिंदे यांना कोणीतरी दम दिला असावा, असं मला जाणवत होतं. कोणीतरी त्यांना पैसे मंजूर करायचे नाहीत, असं म्हटलं असावं”. यावेळी शरद पवारांचा रोख उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवारांकडे दिसत होता. कारण शरद पवारांनी यावेळी अजित पवारांची मिमिक्री देखील केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शरद पवारांनी गुरुवारी शिरूरमधील वडगांव रासाई येथे प्रचारसभेला संबोधित केलं. यावेळी ते म्हणाले, “साखर कारखान्यांना निधी मिळावा यासाठी मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटलो होतो. तेव्हा ते मला म्हणाले, माझी फार अडचण आहे, मला समजून घ्या. त्यावर मी त्यांना विचारलं काय समजून घेऊ? पैसे असताना तुम्ही देत का नाही? मी तुम्हाला कसं समजून घेऊ? त्यावर त्यांनी मला पैसे देता देणं शक्य नाही, असं सांगितलं. त्यांच्या बोलण्यावरून मला जाणवलं की यांना कोणीतरी दम दिलेला दिसतोय. हा दम देणारा कोण आहे माहिती आहे का? ‘हे पैसे मंजूर करायचे नाहीत’, ‘काहीही द्यायचं नाही’ (अजित पवारांच्या स्टाईलमध्ये) असं त्यांना कोणीतरी सांगितलं असावं. बिचारा आमचा एकनाथ, त्याला काय झालं कुणास ठाऊक, त्यांनी मला पैसे देता येणार नाहीत म्हणून सांगितलं. वर मला समजून घ्या अशी विनंती केली”.

हे ही वाचा >> Raj Thackeray : “रमेश वांजळे शेवटचं माझ्याशी बोलले”, राज ठाकरेंनी सांगितली आठवण; म्हणाले, “अनेक जण सोडून गेले, पण…”

आंबेगावातून दिलीप वळसे पाटलांवर टीका

वडगावपाठोपाठ शरद पवारांनी आंबेगाव मतदारसंघातील मंचर येथे प्रचारसभा घेतली. यावेळी पवार उपस्थितांना म्हणाले, महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आंबेगाव मतदारसंघातून आपलं नेतृत्व करण्याची जबाबदारी देवदत्त निकम यांच्यावर सोपवावी.गेल्या अनेक वर्षांचा आंबेगावचा आणि माझा संबंध आहे. जवळपास गेली ५५ ते ६० वर्ष या तालुक्याच्या जनतेशी माझे अत्यंत प्रेमाचे संबंध आहेत. आमचे सहकारी दिवंगत दत्तूशेठ वळसे यांनी मला नेहमी साथ दिली. इथल्या राजकारणातच नव्हे महाराष्ट्राच्या विधानसभेत मी गेल्यानंतर तेही माझ्याबरोबर आमदार होते. महाराष्ट्राच्या विधानसभेत कधीही माझ्याबद्दलचा काहीही प्रश्न हा उपस्थित झाला तर वळसे पाटील पहाडासारखे माझ्या पाठीशी राहायचे. त्यामुळे एक प्रकारचा कौटुंबिक संबंध होता. नंतरच्या काळामध्ये त्यांनी निवडणुकीमध्ये उभं न राहण्याची भूमिका घेतली. मला सांगितलं की आता बरेच दिवस झाले लोकांची सेवा केली. आता या भागाचं काम करण्यासाठी माझ्या चिरंजीवाकडे तुम्ही लक्ष ठेवा. म्हटलं काही हरकत नाही, त्यांनाही माझ्यासोबत काम करण्याची इच्छा होती. मी विरोधी पक्षाचा नेता झालो, मंत्र्याचा दर्जा मला होता. माझ्याबरोबर काम करण्यासाठी दोन-तीन लोकांची आवश्यकता होती. ती आवश्यकता पुरी करण्यासाठी मी निवड केली दिलीप पाटलांची! ते आले, माझ्याबरोबर काम करायला लागले. कसं काम करायचं? सरकार कसं चालतं? विधानसभा कशी चालते? या सगळ्या संबंधीचा अभ्यास माझ्याबरोबर राहून ते करायला लागले.त्यांना अनेक संधी देऊनही ते तिकडे गेले. त्यांच्याबद्दल काय बोलावं. त्यांनी बोलायला काही ठेवलंच नाही.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sharad pawar claims eknath shinde couldnt give funds because of ajit pawar asc