आरक्षणाच्या मुद्द्यावरून सध्या राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापलं आहे. मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यावं, अशी मागणी मराठा नेत्यांनी केली आहे. तर मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण न देता स्वतंत्र आरक्षण द्यावं, अशी भूमिका ओबीसी नेत्यांनी घेतली आहे. इतकंच नाही, या मुद्यावरून अनेक जिल्ह्यात दोन गटात तणावाची परिस्थितीदेखील निर्माण झाली आहे.
या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकदेखील एकमेकांवर टीका टीप्पणी आणि आरोप प्रत्यारोप करत आहेत. आरक्षणावरून सरकार केवळ ओबीसी आणि मराठा नेत्यांना झुलवत असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला आहे. तर विरोधकांनी आधी आरक्षणाबाबत त्यांची भूमिका स्पष्ट करावी, असं आव्हान सत्ताधाऱ्यांनी दिले आहे.
हेही वाचा – आरक्षणाबाबत सरकारची भूमिका अस्पष्ट; सर्वपक्षीय बैठकीला न जाण्याबाबत शरद पवार यांचे स्पष्टीकरण
दरम्यान, राज्यातील एकंदरित परिस्थिती बघता आरक्षणाच्या तुमची भूमिका काय? असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेस प्रमुख शरद पवार यांना विचारण्यात आला होता. याबाबत आता शरद पवार यांनी भाष्य केलं. ते एपीबी माझाच्या ‘माझा महाकट्टा’ या कार्यक्रमात बोलत होते.
नेमकं काय म्हणाले शरद पवार?
“आरक्षणाच्या मुद्यावरून दुर्दैवाने आज राज्यात दोन वेगळे गट पडले आहेत. त्या गटांना कुणीतरी काहीतरी सांगितले आहे. आजच्या राज्यकर्त्यांनीही दोन वेगळ्या बाजू घेतल्या आहेत. राज्याकर्त्यांच्या एका वर्गाने ओबीसींची बाजू घेतली आहे, तर दुसऱ्या वर्गाने मराठा आंदोलकाची बाजू घेतली आहे. हे योग्य नाही, आपण सामंजस्य कसं निर्माण करू शकू यावर अधिक लक्ष देणं गरजेचं आहे. त्यासाठी संवाद आवश्यक आहे”, असं शरद पवार म्हणाले.
मुख्यमंत्र्यांशी झालेल्या बैठकीबाबत म्हणाले…
महत्त्वाचे म्हणजे याच मुद्द्यावर काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. याबाबत विचारलं असता, आजच्या काळात संवाद अतिशय महत्त्वाचा आहे. “सार्वजनिक जीवनात तेव्हा संवाद थांबतो, तेव्हा चुकीच्या समजुती वाढतात. त्यासाठी संवाद गरजेचा आहे आणि त्यासाठी आमच्यासारख्या लोकांनी अधिक लक्ष द्यायला हवं”, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली.
“केंद्राने आरक्षणाच्या मुद्द्यावर लक्ष घातलं नाही”
दरम्यान, आरक्षणाच्या मुद्द्यावर केंद्र सरकार त्यांची भूमिका बजावत आहे, असं वाटतं का? असं विचारलं असता, “अजिबात नाही. केंद्राने यात लक्ष घातलंय, असं दिसत नाही”, असे शरद पवार म्हणाले.