शिवसेनेच्या ४० आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर राज्यात सत्तांतर झाले. सध्या राज्याच्या मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे तर उपमुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस विराजमान झाले आहेत. असे असताना विरोधी पक्षातील राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सरकार केव्हाही कोसळू शकते. त्यामुळे मध्यावधी निवडणुकांसाठी तयार राहा, असा संदेश आपल्या कार्यकर्त्यांना दिला होता, असे म्हटले जात होते. मात्र आता शरद पवार यांनी मी असे काहीही म्हणलो नव्हतो, असे स्पष्टीकरण दिले आहे. ते औरंगाबादेत पत्रकार परिषदेत बोलत होते.
हेही वाचा >> कोल्हापूर माध्यमिक शिक्षक पतसंस्थेत आमदारांना निवृत्त शिक्षक ठरला वरचढ; विरोधकांवर सत्ताधाऱ्यांची मात
“मध्यावधी निवडणुका लागतील असे मी म्हणालोच नव्हतो. दोन अडीच वर्षे राहिली आहेत. त्यामुळे तयारीला आतापासून लागले पाहिजे, असे म्हणालो होते. याचा अर्थ मध्यावधी निवडणुका होतील असा नाही. प्रत्यक्ष निवडणुका येतात. त्याआधी सहा महिने एक वेगळे वातावरण असते. त्यामुळे खरं बघायचं झालं तर आपल्याकडे फक्त दोन वर्षे आहेत. त्या दोन वर्षांमध्ये आपली पूर्ण तयारी असली पाहिजे. हे लक्षात घेऊन तयारीला लागा हे सूचवलं होतं,” असे शरद पवार यांनी सांगितले.
हेही वाचा >> “आपल्याच माणसांनी आमच्यावर वार केले,” एकनाथ शिंदेंनी व्यक्त केली खदखद, रोख नेमका कोणावर?
तसेच, “उद्या विधानसभेच्या निवडणुका तिघांनी मिळून एकत्र लढाव्यात यासाठी चर्चेची प्रक्रिया कधीतरी आपण सुरु करावी असा विचार आम्ही केला होता. चर्चेला सुरुवात केली नव्हती. हा विचार आमच्या डोक्यात होता. आम्ही काँग्रेस किंवा शिवसेनेशी बोललो नव्हतो,” असेही शरद पवार म्हणाले.