राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उद्योजक चोरडिया यांच्या घरी जाऊन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांची भेट घेतली. यानंतर राजकीय तर्कवितर्कांना उधाण आलं. अजित पवारांनी भाजपाबरोबर येण्याचा प्रस्ताव देताना शरद पवारांना कृषीमंत्रीपद, सुप्रिया सुळेंना केंद्रात मंत्रीपद आणि जयंत पाटलांना राज्यात मंत्रीपद देण्याची ऑफर दिल्याचीही चर्चा आहे. याबाबत आता स्वतः शरद पवारांनीच भूमिका स्पष्ट केली. ते बुधवारी (१६ ऑगस्ट) छत्रपती संभाजीनगरमध्ये पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देताना बोलत होते.
शरद पवार म्हणाले, “माजी मुख्यमंत्र्यांनी काय सांगितलं हे मला माहिती नाही. त्या गुप्त बैठकीत असली कोणतीही चर्चा झालेली नाही. एक गोष्ट मी जाहीरपणे सांगितली की, भेट झाली नाही असं नाही. ते मला भेटायला आले.”
“मी पवार कुटुंबाचा प्रमुख आहे”
“पवार कुटुंबातील आम्ही एकंदर जे सर्व भाऊ आहोत, बहिणी आहोत त्या कुटुंबाचा प्रमुख मी आहे. त्यामुळे आमच्या कुटुंबात एक पद्धत आहे की, कुठलाही कौटुंबिक प्रश्न असेल, तर माझ्याशी बोलतात, माझा सल्ला घेतात. त्यासाठी कुणी आलं असेल, तर त्याचा अधिक किस काढण्याचं काही कारण नाही,” असं मत शरद पवारांनी व्यक्त केलं.
हेही वाचा : “मी पुन्हा येईन”; मोदींच्या वक्तव्यावर शरद पवार म्हणाले, “देवेंद्र फडणवीसांसारखी…”
“तुमच्या गुप्त भेटीमुळे काँग्रेस आणि ठाकरे गटाने वेगळा प्लॅन केलाय का?”
तुमच्या गुप्त भेटीमुळे काँग्रेस आणि ठाकरे गटाने वेगळा प्लॅन केलाय का? राष्ट्रवादीला बाजूला ठेऊन काँग्रेस-शिवसेना (ठाकरे गट) एकत्र येणार आहे का या प्रश्नावर शरद पवार म्हणाले, “राष्ट्रवादीला बाजूला ठेऊन काँग्रेस-शिवसेना (ठाकरे गट) एकत्र येणार अशी चर्चा आहे, पण ही वस्तूस्थिती नाही. तुम्ही आजचं संजय राऊत यांचं वक्तव्य वाचलं असेल, तर या सगळ्या गोष्टी असत्यावर आधारित आहेत, असं त्यांनी निवेदन दिलं आहे.”