राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांच्या वयाचा मुद्दा उपस्थित करत बंडखोरी करणाऱ्या अजित पवार गटावर जोरदार हल्लाबोल केला. पवारांनी कोणत्याही नेत्याचा थेट उल्लेख न करात कुणीतरी असं म्हणत अप्रत्यक्षपणे टीका केली. “मला एवढंच सांगायचं आहे की, माझं वय झालं म्हणता, तुम्ही माझं काय बघितलं आहे,” असं वक्तव्य शरद पवारांनी केलं. यानंतर उपस्थितांनी शिट्ट्या वाजवत आणि टाळ्यांचा कडकडाट करत त्याला दाद दिली. यावेळी आमदार रोहित पवारांनाही हसू अनावर झालं. ते गुरुवारी (१७ ऑगस्ट) बीडमधील स्वाभिमान सभेत बोलत होते.
शरद पवार म्हणाले, “बीडमधील नेत्यांना काय झालं मला माहिती नाही. एक कुणीतरी आमचा सहकारी पक्ष सोडून केला असं एका नेत्याने सांगितलं. कालपर्यंत ठीक होता, काय झालं म्हणून चौकशी केली. तेव्हा समजलं की, त्यांनी कुणीतरी सांगितलं की, शरद पवारांचं वय झालं आहे. त्यामुळे आपल्याला भवितव्याचा विचार करायचा असेल, तर दुसरा नेता निवडला पाहिजे.”
“माझं वय झालं म्हणता, तुम्ही माझं काय बघितलं”
“मला एवढंच सांगायचं आहे की, माझं वय झालं म्हणता, तुम्ही माझं काय बघितलं आहे. त्यामुळे तुम्हाला सामुदायिक शक्ती उभी केल्यावर काय होतं हे या जिल्ह्यातील जनतेच्या पाठिंब्यावर आम्ही एकदा दाखवून दिलं आहे. इथल्या तरुण पीढीच्या मदतीने अनेकांचे पराभव इथं झाले आहेत,” असं मत शरद पवारांनी व्यक्त केलं.
व्हिडीओ पाहा :
“ज्यांच्यामुळे आयुष्य बरं झालं त्यांच्याबद्दल थोडी माणूसकी ठेवा”
शरद पवार पुढे म्हणाले, “माझं एकच सांगणं आहे की, सत्तेच्या बाजूला तुम्हाला जायचं असेल, तर जा, पण निदान ज्यांच्याकडून आयुष्यात काही घेतलं असेल, बरं झालं असेल त्यांच्याबद्दल थोडी माणूसकी तरी ठेवायचा प्रयत्न करा. हे नाही केलं, तर लोक त्यांना योग्य प्रकारचा धडा देतील.”
हेही वाचा : “मणिपूर पेटलंय, स्त्रियांची धिंड काढली गेली तरीही पंतप्रधान…”, शरद पवारांचा गंभीर आरोप
“मतदार कोणतं बटन दाबायचं आणि त्यांना कुठं पाठवायचं हा निर्णय घेतील”
“माझी तक्रार ही आहे, की मागील निवडणुकीत त्यांनी जनतेची मदत घेतली. लोकांनी निवडून दिलं आणि भाजपाचा पराभव केला. भाजपाचा पराभव करून ते सत्तेत आले आणि आज त्यांनी भाजपाच्या दावणीला जाऊन बसायची भूमिका घेतली. ते आज हे करत आहेत, पण उद्या जेव्हा लोकांना मतदान करण्याची संधी मिळेल त्यावेळी कोणतं बटन दाबायचं आणि त्यांना कुठं पाठवायचं हा निर्णय या जिल्ह्यातील प्रत्येक मतदार घेतल्याशिवाय राहणार नाही,” असा इशारा शरद पवारांनी धनंजय मुंडेंचं नाव न घेता दिला.