मुंबईत देशातील विरोधी पक्षांची आघाडी असलेल्या ‘इंडिया’ची पत्रकार परिषद सुरू असताना तेव्हाच जालन्यात मराठा आक्रोश मोर्चातील आंदोलकांवर पोलिसांनी लाठीहल्ला केला. यानंतर या दोन्ही घटनांचा संबंध जोडत अनेक तर्कवितर्क लावले गेले. ‘इंडिया’च्या पत्रकार परिषदेवरून लक्ष हटवण्यासाठीच पोलिसांना लाठीचार्ज करण्याचे आदेश दिल्याचाही आरोप झाला. आता या तर्कवितर्कांवर शरद पवारांनाच विचारलं केलं. तेव्हा त्यांनी भूमिका स्पष्ट केली. ते शनिवारी (२ सप्टेंबर) जालन्यात माध्यमांशी बोलत होते.
शरद पवार म्हणाले, “मुंबईत इंडियाची आघाडीची पत्रकार परिषद सुरू झाली, तेव्हाच जालन्यात लाठीहल्ला झाला यात काही कनेक्शन आहे की नाही याची माहिती माझ्याकडे नाही. पण संपूर्ण हिंदुस्थानच नाही, तर आशिया खंडाचं इंडियाच्या बैठकीत काय भूमिका घेतली जाते याकडे लक्ष होतं. सात राज्यांचे मुख्यमंत्री तेथे उपस्थित होते. पाच राज्यांचे माजी मुख्यमंत्री तेथे आले होते.”
“मुंबईत काय घडतं याकडे सर्वांचं लक्ष होतं”
“देशाचा विरोधी पक्षनेता या बैठकीला उपस्थित होता. सोनिया गांधी, राहुल गांधींसह अनेक मान्यवर लोक या बैठकीला हजर होते. त्यांनी देशासाठी एका भक्कम पर्यायाची चर्चा केली. यावर मागील १५ दिवस देशासह बाहेरील वर्तमानपत्रात चर्चा झाली. त्यामुळे साहजिक आहे की, मुंबईत काय घडतं याकडे सर्वांचं लक्ष होतं,” असं मत शरद पवारांनी व्यक्त केलं.
हेही वाचा : जालन्यात मराठा मोर्चावरील लाठीचार्जवर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “मुळात मराठा समाजाने…”
“बैठकीवरील लक्ष विचलित करण्यासाठी असा उद्योग केला की काय…”
“मुंबईतील या महत्त्वाच्या बैठकीवरील देशाचं लक्ष दुसरीकडे विचलित करण्यासाठी असा काही उद्योग केला की काय, अशी शंका काही लोकांच्या मनात आहे. त्याविषयी विश्वासार्ह माहिती माझ्याकडे नाही,” असंही शरद पवारांनी नमूद केलं.