मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्य सरकारला दिलेला ४० दिवसांचा वेळ संपल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी यावर भाष्य केलं. “जे करणं शक्य नाही त्याचा शब्द कधी देऊ नये,” असं स्पष्ट मत शरद पवार यांनी व्यक्त केलं. तसेच सध्याच्या परिस्थितीला उपोषण करणाऱ्यांना दोष देता येणार नाही, असंही नमूद केलं.
शरद पवार म्हणाले, “मनोज जरांगे पाटलांनी काही मागण्या केल्या आहेत. त्या मागण्यांबाबत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मनोज जरांगेंशी सुसंवाद केला. त्यांच्यात प्रत्यक्ष काय बोलणं झालं हे मला माहिती नाही. वर्तमानपत्रावरून जरांगेंनी सरकारला ३० दिवसांचा वेळ दिला. त्यात आणखी काही वाढ झाली.”
“जे करणं शक्य नाही त्याचा शब्द कधी देऊ नये”
“सरकारने मनोज जरांगेंना दिलेल्या वेळेत आरक्षणावर निर्णय घेऊ, असं आश्वासन देण्यात आलं होतं. मात्र, ते आश्वासन पूर्ण झालेलं दिसत नाही. जे करणं शक्य नाही त्याचा शब्द कधी देऊ नये. त्यामुळे आता उपोषण करणाऱ्यांना दोष देता येणार नाही,” असं मत शरद पवार यांनी व्यक्त केलं.
“पंतप्रधानच जाणूनबुजून काल त्यावर काही बोलले नाहीत का?”
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी शिर्डी दौऱ्यावर असताना भाषणात त्यांनी मराठा आरक्षण आंदोलनाचा उल्लेखही केला नाही, असं म्हणत आता मनोज जरांगे पाटील यांनी पंतप्रधान, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांवर कारस्थान केल्याचा आरोप केला. मनोज जरांगे म्हणाले, “परवा मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री दिल्लीला गेले होते. पंतप्रधानांना त्यांनी मराठा आरक्षणाबाबत सांगितलं असेल असं वाटलं होतं. पण पंतप्रधानांना या दोघांनी मराठा आरक्षणाबाबत व त्यासाठीच्या आंदोलनाबाबत सांगितलं नाही अशी शंका आहे. जर त्यांनी सांगितलं असेल, तर पंतप्रधानच जाणूनबुजून काल त्यावर काही बोलले नाहीत का? पंतप्रधानांना गोरगरीबांची गरज राहिली नाही, असा अर्थ महाराष्ट्रातील जनता आता काढायला लागली आहे.”
हेही वाचा : “मला हिंदुराष्ट्र भारतातील सर्वांना सांगायचं आहे की, आता…”; गुणरत्न सदावर्तेंचं वक्तव्य चर्चेत
“…तर मोदींचं विमान शिर्डीत उतरू दिलं नसतं”
“पंतप्रधान बोलले काय किंवा नाही बोलले काय, मराठ्यांना काही फरक पडत नाही. पण समाज शांत यासाठी होता की पंतप्रधान हा विषय हाताळतील असं समाजाला वाटलं होतं. मुख्यमंत्र्यांना हा विषय मार्गी लावण्याबाबत सांगतील असं वाटलं होतं. पंतप्रधानांच्या बाबतीत मराठ्यांच्या मनात वैरभावना नव्हती. जर तशी असती, तर पंतप्रधानांचं विमानही शिर्डीत खाली उतरू दिलं नसतं. ते वरचेवरच परत पाठवलं असतं”, असंही जरांगे पाटील यांनी नमूद केलं.