शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे हे इतिहासकार नाहीत, या जितेंद्र आव्हाड यांच्या मताशी सहमत असल्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी स्पष्ट केले. पुरंदरे यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराने सन्मानित केल्यामुळे निर्माण झालेल्या वादाबाबत ते सोमवारी येथे बोलत होते.
खरा इतिहास सांगणाऱ्यांना यमसदनी पाठविले जाते आणि शिवशाहिरी करणाऱ्यांना पुरस्कार दिला जातो, हे जितेंद्र आव्हाड यांचे वैयक्तिक मत आहे, मात्र ती पक्षाची भूमिका नाही, असेही पवार यांनी यावेळी स्पष्टपणे सांगितले. मात्र बाबासाहेब पुरंदरे इतिहासकार नसल्याच्या आव्हाड यांच्या मताशी पवारांनी सहमती दर्शविली. मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीने झालेल्या कार्यक्रमानंतर त्यांनी संवाद साधला.
वेगळ्या विदर्भाच्या मुद्दय़ावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुन्हा एकदा दोन्ही डगरींवर हात ठेवल्याचे स्पष्ट झाले. विदर्भातील जनतेला स्वतंत्र राज्य हवे असेल तर राष्ट्रवादीची काही हरकत नाही असे सांगताना, पवार यांनी विदर्भातील जनता मात्र या प्रश्नावर नेत्यांच्या पाठीमागे नाही, असेच वारंवार झालेल्या निवडणुकांमधून स्पष्ट झाले आहे. तेथील जनता या मुद्दय़ावर अनुकूल नाही, असे पवार यांनी सांगितले. अवकाळीने ग्रासलेल्या मराठवाडय़ासारख्या काही भागात पुन्हा एकदा कर्जमाफीची आवश्यकता असल्याचेही त्यांनी सांगितले. केळकर समितीच्या शिफारशी स्वीकारून असमतोल लवकरात लवकर दूर व्हावा. विशेषत: पाण्याच्या क्षेत्रात अधिक तरतूद व्हावी. त्यासाठी सरकारने खुल्या बाजारपेठेतून रक्कम उभी करावी. यासाठी कर्ज घ्यावे, असेही पवार यांनी सुचविले.
..युती फिसकटेल
केंद्र आणि राज्य सरकारच्या कारभारावर लगेच निष्कर्ष काढता येणार नाही. सत्ताधारी पक्षातील एकाने सांगितले की, मुंबई महापालिकेसाठी युतीची बोलणी होईल, तेव्हा साहजिकच जागावाटपावरून फिसकटेल, असे सांगितले गेले. त्यावरून मी बोललो होतो. मात्र, मध्यावधी निवडणुका होतील, असे आपले वक्तव्य नव्हते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा